राष्ट्रवादीच्या दुसर्या यादीत माढ्याबाबत सस्पेन्सच
राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली असून यास मावळमधून पार्थ अजित पवार यांना तिकिट देण्यात आले आहे. दरम्यान या यादीत माढ्याचे नाव नसल्याने येथील उमेदवारीबाबतचा सस्पेन्स कायम राहिला आहे. दरम्यान माढ्यातून न उभारण्याच्या शरद पवार यांच्या निर्णयाचे विरोधक टिकात्मक भांडवल करू लागले आहेत तर दुसरीकडे पक्षातील अनेकांनी आता साहेबांना माढ्यातून लढाच असा आग्रह सुरू केल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाने आपली दुसरी यादी शुक्रवारी जाहीर केली असून यात पाच जागांचा समावेश आहे. यात माढ्याचे नाव असेल अशी शक्यता व्यक्त होती मात्र या जागेचा सस्पेन्स कायम राहिला आहे. येथून राष्ट्रवादीची चाचपणी अद्याप ही सुरूच आहे, तर भाजपाने ही आपला उमेदवार जाहीर न करण्याची भूमिका घेतली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आपले काम या मतदारसंघात सुरूच ठेवले आहे.
राजकीय कारकिर्दीत 14 निवडणुका लढूून त्या जिंकणार्या खासदार शरद पवार यांच्या माढ्यातील उमेदवारीबाबतच्या निर्णयाचे आता विरोधकांनी भांडवल करण्यास सुरूवात केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दवठ ठाकरे यांनी ही आज अमरावतीच्या सभेत याबाबत वक्तव्य केली आहेत. यामुळे सहाजिकच राष्ट्रवादीत अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. पवार यांनी माढ्यातून उमेदवारी घेण्याचा निर्णय घेतला व नंतर काही दिवसात तो बदलला यामुळे राज्यभरातील कार्यकर्ते व पदाधिकार्यांचे मनोबल खच्चीकरण होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी पवार यांना पुन्हा माढ्यातून लढाच अशी विनंती वजा सल्ला दिल्याचे समजते.
दरम्यान पहिल्या व दुसर्या उमेदवारी यादीत माढ्याचे नाव नसून आता शेवटच्या यादीत ते येईल व यात कोणाचे नाव असणार याबाबत बरेच अंदाज बांधले जात आहेत. अद्याप ही उमदेवारीची चाचपणी होत असली तरी शरद पवार यांच्या मनात काय आहे हे समजणे कठीण असते. दरम्यान माढा मतदारसंघ व सोलापूर जिल्ह्याचे याच निर्णयाकडे आहे.