राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत माढ्याचा समावेश नाही
उमेदवारीबाबत अद्याप ही संभ्रम कायम, भाजपाचा ही सस्पेन्स
राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांना फेव्हरेट असणार्या माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा संभ्रम अद्याप संपला असून राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत या मतदारसंघाचे नाव नाही. दरम्यान येथून या पक्षाचा उमेदवार कोण असणार ? याबाबत खूप तर्कवितर्क लढविले जात आहेत. तशीच अवस्था भारतीय जनता पक्षाची असून प्रतिस्पर्धी उमेदवार निश्चित नसल्याने सत्ताधार्यांनी ही आपले पत्ते उघडलेले नाहीत.
मागील महिन्यात दस्तुरखुद्द शरद पवार यांची उमेदवारी येथून निश्चित करण्यात आली. सांगोल्याच्या दुष्काळी परिषदेत यावर शिक्कामोर्तब झाले नव्हे तर प्रचाराची तयारी ही सुरू झाली. पवार यांनी यानंतर माढा, फलटण, करमाळा व माळशिरस या भागाचा दौरा केला. शरद पवार येथून निवडणूक लढविणार म्हंटल्यानंतर कार्यकर्ते व पदाधिकारी कामाला लागले होते. पवार यांच्या उमेदवारीवरून बरीच चर्चा माढ्यात रंगली होती. त्यांच्या अचानक या मतदारसंघात येण्याने येथे अनेक वर्षे तयारी करणार्यांसाठी तो धक्काच होता. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे काम चांगले असताना ही त्यांचा मतदारसंघ पवार यांनी घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. दरम्यानच्या काळात सोशल मीडियात खूप प्रतिक्रिया नोंदविल्या गेल्या. पवार यांनी या मतदारसंघाचा कानोसा घेतला तसेच मावळमधून त्यांचे नातू पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी वाढता दबाव पाहता एकाच घरातून तीन तीन जण लोकसभेच्या रिंगणात नको ,असे म्हणत माढ्यावरील दावेदारी मागे घेतली. यानंतर ही अनेक पवार समर्थकांनी साहेबांना पुन्हा माढ्यातून उभारण्याचा आग्रह सुरूच ठेवला आहे. यासाठी सोलापूरला तर लाक्षणीक उपोषण केले गेले आहे.
दरम्यान पवार हे माढ्यातून पुन्हा निवडणूक लढविणार म्हंटल्यावर येथील राष्ट्रवादीमधील मोहिते पाटील विरोधकांनी याचे स्वागत केले व रेड कार्पेट आंथरले. जिल्ह्यात मोहिते पाटील विरोधकांनी जी भाजपा प्रणित महाआघाडी तयार केली होती त्यांची मात्र पवार यांच्या माढ्यातील आगमनाने गोची झाली होती. आमदार प्रशांत परिचारक व जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे व त्यांचे सहकारी शरद पवार यांना निवडणुकीत विरोध करणार की त्यांचा प्रचार ? याबाबत चर्चा रंगत होत्या. मात्र अचानक पवार यांनी भूमिका बदलली व महाआघाडीच्या नेत्यांना दिलासा मिळाला. त्यांच्यासमोर शरद पवार यांची साथ करायची की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाळायचा ? असा दुहेरी प्रश्न होता. मात्र आता त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
शरद पवार यांनी माढ्यातून उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर येथे कोणाला संधी मिळणार ? याबाबत उत्सुकता सर्वांनाच आहे. सोमवारी पुण्यातील बैठकीत विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील यांची नावे पुढे आली खरी पण मंगळवारी रणजितसिंह यांनी भाजपाचे दिग्गज नेते व मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. ही भेट कारखान्याच्या कामासाठी होती असा खुलासा जरी केला गेला असला तरी या लोकसभेच्या रणधुमाळीत अशी भेट बरेच काही सांगून जाते, यामुळे याबाबत तर्कविर्तक लढविले जात आहेत. पवार यांनी माढ्यात येण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वात जास्त नाराजी ही मोहिते पाटील समर्थकात होती. यानंतर पवार यांचा निर्णय बदलला परंतु तोवर खूप उशीर झाल्याचे चित्र दिसत होते. माढ्यातून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यासह दीपक साळुंखे यांची नावे ही आघाडीवर आहेत याच बरोबर जिल्ह्याच्या राजकारणातील एक मातब्बर नेत्याला ही राष्ट्रवादी पक्षात परत आणण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे.
पवार यांची माढ्यातून न लढण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीमधील बर्याच पवार समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे. ते आज ही साहेबांनी उमेदवारीबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीमधील उमेदवारीचा तिढा कायम असून आता शरद पवार येथून कोणाला संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जोवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरणार नाही तोवर भाजपा ही येथून आपले पत्ते उघडणार नाही हे निश्चित आहे. गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात माढ्याचे नाव नाही.
शरद पवार यांच्या उमेदवारी न स्वीकारण्याच्या निर्णयानंतर भाजपाने आता माढ्यातून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली असून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नाव आघाडीवर आहेच परंतु याच बरोबर महाआघाडीचे नेते संजय शिंदे यांच्या हातात कमळ देण्यास मुख्यमंत्री इच्छुक होते परंतु शिंदे यांनी नकार दिला आहे.