‘राष्ट्रविकासात महिलांचे योगदान’या विषयावर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने मंगळवारी चर्चासत्र
सोलापूर, दि.23- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलातर्फे राष्ट्रीय एकात्मता सप्ताहानिमित्त मंगळवार, दि. 23 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रविकासात महिलांचे योगदान या विषयावर ऑनलाइन विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी दिली.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या विशेष चर्चासत्रात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, चित्रपट निर्मात्या सायली जोशी या प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. यात प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आज सर्वच क्षेत्रात महिलांचे कार्य आणि योगदान वाढले आहे. विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी महिला समर्थपणे सांभाळत आहेत. राष्ट्रीय विकासात महिलांचे योगदान काय? याविषयी विचारमंथन होण्याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मान्यवरांकडून यात मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी ऑनलाईन लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.