रेल्वे कोचमध्ये कोरोना बाधितांसाठी तयार करण्यात आयसोलेशन वॉर्डची विभागीय आयुक्तांकडून पाहणी
पुणे, दि.5: भारतीय रेल्वेमार्फत पूर्वतयारी म्हणून कोरोना बाधित रुग्णांसाठी आयसोलेशन कंपार्टमेन्ट वार्ड तयार केले जात आहेत.
पुण्यातील घोरपडी येथील कोच रिपेअर डेपो येथे कोचमध्ये साईसुविधा तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे, आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आयसोलेशन सुविधेची प्रत्यक्ष पाहणी करुन रेल्वेच्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी वरिष्ठ मंडल यांत्रिक अभियंता विजयसिंग धडस, कोचिंग डेपो अधिकारी राहुल गर्ग आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून कोवीड-19 रुग्णांसाठी आयसोलेशन कंपार्टमेंट वॉर्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक बोगीत 16 ते 18 रुग्णांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. पुणे विभागात पहिल्या टप्प्यात 50 कोच पुरविण्यात येणार आहे. यामध्ये 800 ते 900 रुग्णांची व्यवस्था होऊ शकेल.रेल्वेने या सुविधेत रुग्णांना सुविधा देण्याच्या दृष्टीने आवश्यक बदल केले असून येत्या दोन दिवसात दोन कोच उपलब्ध होतील, उर्वरित कोच आठ दिवसात उपलब्ध होतील, असेही सांगून रेल्वेने निर्माण केलेल्या कोच सुविधेबाबत डॉ. म्हैसेकर यांनी समाधान व्यक्त केले.