लढायचे कोणाशी कोरोनाशी की दारूड्यांशी..? आरोग्य यंत्रणेसमोर प्रश्न… अकलूजमध्ये मद्यपिंचा कोविड रूग्णालयात धुमाकूळ..
( प्रशासनास संरक्षण मागणीचे निवेदन देताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन एकतपुरे व अन्य डॉक्टर)
अकलूज, दि. ७ – एका बाजूला जीवावर उदार होवून आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढत आहे. अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना अकलूजमध्ये नव्यानेच सुरू झालेल्या कोविड हॉस्पिटल येथे दोन दारूङ्यांनी धुमाकूळ घालून डॉक्टरांना शिव्या देत वॉर्डबॉयला लोखंडी पंचने मारहाण केली. याबाबत अकलूज
पोलीस ठाण्यत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोरच हाकेच्या अंतरावर असलेल्या एमटीडीसी हॉलमध्ये नव्यानेच शंभर बेडच्या अकलूज कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या तेथे ३५ कोरोनाग्रस्त रूग्ण उपचार घेत आहेत. दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास नामदेव खेमनार ड्युटीवर असताना दोन तरूण हॉस्पिटलमध्ये आले व दुसऱ्या मजल्यावर जाऊन दारू पिऊन एकमेकांना शिवीगाळ करू लागले. खेमनार यांनी या तरूणांना अडवले असता यातील एकाने आपल्या खिशातील लोखंडी पंच काढून खेमनार यांना मारायला सुरुवात केली व दुसर्याने खेमनार यांना जिन्यावरून खाली ढकलून दिले.
ही माहिती खेमनार यांनी तेथे ड्युटीवर असणारे डॉक्टर नितीन कुबेर यांना सांगितल्यानंतर डॉक्टर घटनास्थळी गेले तेव्हा सदर आरोपींनी डॉक्टरांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व पुन्हा खेमनार यास मारहाण करत त्यांचा शर्ट फाडला. ही घटना समजल्यानंतर सर्व डॉक्टर मंडळी घाबरून गेली. आज दि. ७ रोजी अकलूज कोवीड हॉस्पिटल येथे सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेऊन दवाखान्यासाठी शासनाच्या संरक्षणाची मागणी केली. यापूर्वी डॉक्टरांनी पेशंट बिलासाठी किंवा दाखल करून घेण्यासाठी डॉक्टरांच्या अंगावर धावून जात असल्याची तक्रार होत होती. ज्यावेळी दवाखान्यात गोंधळ झाला त्यावेळी तेथून अकलूज पोलीस ठाण्यास फोन करण्यात आला. यानंतर पोलिसांनी सदर तरूणांना नंतर अटक केली व त्यांच्यावर भादंवि १९६० प्रमाणे ३२४, ३२३,
५०४, ५०६, ३४, २७०, ४२७, ४५२ व महाराष्ट्र वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध अधिनियम २०१० प्रमाणे ४, साथीचे रोग अधिनियम १९९७ प्रमाणे ३, महाराष्ट्र कोविड विनियमन २०२० प्रमाणे ५ अशा कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन एकतपुरे म्हणाले, अगोदरच आम्ही जीवघेण्या कोरोना आजारा बरोबर लढत आहोत. आमचे सुमारे १५ डॉक्टरांना रूग्णांवर उपचार करत असताना कोरोनाची बाधा झालेली आहे. येथे वेळेवर ऑक्सिजन मिळत नाही. भीतीपोटी सफाई कामगार व नर्सिग स्टाफ मिळत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत सेवा देत असताना जर आमच्या लोकांवर हल्ला होत असेल तर आम्ही हे हॉस्पिटल बंद करतो. शासनाने ते ताब्यात घ्यावे. अन्यथा आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे. सध्या आम्ही मोठ्या दडपणाखाली काम करतो आहोत.
उद्घाटनावेळी पालकमंत्री आम्हास येथे ऑक्सिजन उपलब्ध करून देतो म्हणाले होते. परंतु ऑक्सिजनसाठी आम्हाला मोठा संघर्ष करावा लागतोय. रूग्णांच्या तपासणीत वेळ घालवण्यापेक्षा आमच्या डॉक्टरांचा वेळ ऑक्सिजन उपलब्ध करण्यातच जातोय. जो नर्सिंग स्टाफ पूर्वी ५-१० हजार रूपयांत काम करत होता तो आता ३० ते ४० हजार रूपये पगार मागतो आहे. आक्सिजनच्या किंमतीही तिपटीने वाढल्या आहेत. सफाई कर्मचाऱ्यांची आम्ही प्रशासनाकडे मागणी केली तर कोणी प्रांताकडे बोट दाखवतो तर कोणी ग्रामपंचायतीकडे बोट दाखवतो आहे.