लसीकरणाची पूर्वतयारी काटेकोर करा सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या सूचना

सोलापूर, दि.6: कोविड लसीकरणाच्या अंमलबजावणीबाबत आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री यांचे कोविडविषयक सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज येथे दिल्या.

कोरोना लसीकरणाच्या अंमलबजावणीबाबत आज जिल्हा कृतीदल समितीची आढावा बैठक झाली. या बैठकीत डॉ. म्हैसेकर यांनी वरील सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कोविडविषयकचे राज्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे आदी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरूवातीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी कोरोनाच्या चाचण्या, तपासणी, उपचार आणि त्या अनुषंगाने तयार केलेल्या पायाभूत सुविधांची माहिती दिली. लसीकरणाबाबत करण्यात आलेल्या तयारीचीही त्यांनी माहिती दिली. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते यांनी महापालिकेच्या क्षेत्रातील माहिती दिली.

डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, राज्यातील चार जिल्ह्यात कोविड लस देण्याची चाचणी घेण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात येत्या शुक्रवारी चाचणी घेतली जाणार आहे. या चाचणीसाठी आवश्यक ती सर्व तयारी केली जावी. लसीकरणाच्या अंमलबजावणीसाठी कर्मचारी, डॉक्टर, सपोर्ट स्टाफ यांना प्रशिक्षण दिले जावे.

डॉ. साळुंखे यांनी जिल्ह्यातील मोठी हॉस्पीटल निश्चित करावीत. त्या हॉस्पीटलला शासनाकडून लस पुरवली जाईल. संबंधित हॉस्पीटल प्रशासनावर लसीकरणाबाबतची सर्व जबाबदारी सोपवण्याचा विचार सुरु आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सामान्य नागरिकांना लस दिली जाणार नाही. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि आघाडीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्याबाबतची तयारी केली जावी, असे सांगितले.

यावेळी वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप कुमार ढेले, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बगाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विशाल बडे आदी उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!