लोकांसाठी धडपडणारा लोकनेता हरपला
राजकारण, सहकार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व
सोलापूर, :- माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने पंढरपूर नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. नेहमी लोकांसाठी धडपड करणारे सुधाकरपंत परिचारक खऱ्या अर्थाने लोकनेते होते. राजकारणात, सहकार क्षेत्रात आदर्श व्यक्तिमत्व कसे असावे ते त्यांच्याकडे पाहिल्यावर समजते. अशा शब्दात माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कै. सुधाकरपंतांना श्रध्दाजली वाहिली आहे.
पंढरपूरच्या विकासाठी नेहमी प्रयत्नशील असायचे. पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी पंढरपूरच्या नदीकाठी घाट असावा, पालखी मार्गाची सुधारणा व्हावी येणाऱ्या भाविकांना तसेच पंढरपूरमध्ये राहणाऱ्यांना सोई सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी चांगले काम केले आहे. कै. औदुंबरअण्णा यांच्यानंतर ते पंढरपूरचे आमदार झाले. अनेक संस्था त्यांनी निर्माण केल्या. साखर कारखाने उभा केले. शरद पवार यांच्या सोबत त्यांनी काम केले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर अन्य पक्षातील नेते कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संपर्क होता. अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी समाजाची सेवा केली. राजकारणातील संत म्हणूनच त्यांची ओळख आहे. त्यांचे समाजोपयोगी कार्य सोलापूरकर नव्हे संपूर्ण महाराष्ट्र अनंत काळापर्यत लक्षात ठेवेल. त्यांच्या निधनाने परिचारक कुटुंबावर मोठा आघात झाला आहे तो सहन करण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो. सुधाकरपंत परिचारक यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत असल्याचे ते म्हणाले.
वडीलकीचे छत्र हरपले : विजयदादा
अकलूज– सहकार महर्षींच्या निधनानंतर सोलापूरला जिल्ह्यातील मान्यवरांची बैठक झाली . या बैठकीत सुधाकरपंत परिचारक यांनी इथून पुढे जिल्ह्याचे राजकारण विजयदादांनी पहावे आम्ही तुमच्या पाठीशी राहू असे सांगितले . त्यावेळी जिल्हा बॅंक , जिल्हा परिषद , जिल्हा दूध संघ , जिल्हा भूविकास बॅंक आदी संस्था आमच्या हातात नव्हत्या . त्यानंतरच्या काळात जिल्ह्याच्या राजकारण , समाजकारण , सहकार आदी क्षेत्रात सुधाकरपंतांनी वडिलकीच्या भावनेने साथ दिली . ते आमच्या परिवाराचे घटक बनले . जिल्ह्याच्या निर्णय प्रक्रियेत त्यांनी कधी माझा शब्द मोडला नाही व मीही त्यांचा शब्द मोडला नाही . माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यावर पंतांच्या शब्दाखातर मी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली . आज पंत आपल्यात नाहीत याचे दु:ख सर्वानाच आहे . त्यांच्या निधनाने जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वाची पोकळी जाणवणारी आहे . ते आमचे मार्गदर्शक होते .त्यांच्या जाण्याने वडीलकीचे छत्र हरपले . अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिली.