“विठ्ठल”च्या अध्यक्ष निवडीसह मतदारसंघावर पवारांचे लक्ष, भगीरथ भालके यांनाच संधी मिळण्याची शक्यता
पंढरपूर – पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवड सोमवार 21 डिसेंबर रोजी होणार आहे. या कारखान्याचे अध्यक्ष हेच विठ्ठल परिवाराचे नेते मानले जातात. यामुळे आता या पदावर कोणाची निवड होणार? याकडे सार्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भगीरथ भालके यांना संधी दिली जाईल अशी चर्चा आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या कारखान्यासह मतदारसंघावर बारीक लक्ष आहे.
आमदार कै. भारत भालके हे जवळपास अठरा वर्षे कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. 2002 मध्ये स्व. वसंतराव काळे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर भालके यांना संधी मिळाली होती. यानंतर भारत भालके हे विठ्ठल परिवाराचे नेते बनले. यांनी पंढरपूर तालुका मतदारसंघातून 2004 ला विधानसभा लढविली होती. यात ते पराभूत झाले मात्र 2009 ला पुनर्रचित मतदारसंघातून विजयी झाले व जवळपास 29 वर्षानंतर विठ्ठल परिवारात आमदारकी आली. यानंतर त्यांनी सलग तीन वेळा पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात विजय मिळविला. मात्र 28 नोव्हेेंबर रोजी त्यांचे निधन झाले. यामुळे आता अध्यक्ष निवडीसाठी सहाय्यक निबंधक एस.एम. तांदळे यांनी संचालकांची बैठक 21 रोजी सकाळी अकरा वाजता कारखाना कार्यस्थळावर बोलाविली आहे.
दरम्यान कै. भारत भालके यांनी आपल्या कारकिर्दीत विठ्ठल परिवारात एकता निर्माण करता सर्व नेत्यांना एकत्र आणले होते. विठ्ठल परिवाराचे दिग्गज नेते कै. राजूबापू पाटील यांचे ही निधन झाले आहे. ते विठ्ठल कारखान्याचे संचालक होते. आता 21 तारखेच्या बैठकीत कारखान्याचे नवीन अध्यक्ष कोण असणार? याबाबत उत्सुकता आहे. भगीरथ भालके यांच्या पाठीशी विठ्ठल परिवाराची ताकद उभी केली जाईल असे दिसत आहे. कै. भारत भालके व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संबंध अत्यंत चांगले होते. आताच्या परिस्थितीमध्ये ही पवार यांचे लक्ष पंढरपूरकडे असणार हे निश्चित. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भगीरथ भालके यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.