विठ्ठलाची महापूजा न करता येण्याचे दुःख.. तुम क्या जानो गोपीचंदबाबू..

प्रशांत आराध्ये

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आषाढी एकादशीला पंढरपूरला येवून श्री विठ्ठल रखुमाईची महापूजा करू नये असा सल्ला दिला. यानंतर सोलापूरला याच विषयावर बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी महापूजेला येवू नये असे म्हणणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. कारण स्वतः फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतानाही महापूजेला येवू न शकण्याचे दुःख सोसलं आहे. 2018 च्या आषाढी एकादशीला त्यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील निवासस्थानीच विठ्ठलाची पूजा केली होती. यामुळे कदाचित यंदाच्या महापूजेचा विषय आल्यावर फडणवीस यांना दोन वर्षापूर्वीची आठवण झाली असणार, त्यांच्या मनात विचार आला असेल, विठ्ठलाची महापूजा न करता येण्याचे दुःख.. तुम क्या जानो गोपीचंदबाबू..

2018 च्या आषाढी यात्रेदरम्यान मराठा आरक्षणाचा विषय राज्यात ऐरणीवर आला होता. तेंव्हा आंदोलकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एकादशीची महापूजा करू न देण्याचा इशारा दिला होता. ऐन वारीत आंदोलन नको म्हणून फडणवीस यांनी मुंबईत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विठ्ठल रूक्मिणीची महापूजा केली होती. श्री विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून याची महापूजा करण्याची इच्छा सर्वांनाच असते. आषाढी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सोहळा व एकादशीची शासकीय महापूजा ही परंपरेप्रमाणे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री करतात. क्वचितच या महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते न झाल्याच्या घटना आहेत. यात 2018 चा समावेश आहे.

आता कोरोनाचा राज्यभर प्रादुर्भाव आहे, यामुळे आषाढीवारीच रद्द आहे तसेच पायी पालख्यांना ही परवानगी नाकारण्यात आली आहे. परंपरा जपण्यासाठी प्रशासनाच्या वतीने केवळ संतांच्या पादुका एकादशीला पंढरीत आणल्या जाणार आहेत. दरम्यान आषाढीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंढरपूरला यावे असे आमंत्रण मंदिर समितीच्या वतीने देण्यात आले असले तरी अद्याप मुख्यमंत्री यासाठी येणार की नाही हे स्पष्ट नाही. तोवरच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांनी पंढरीत येवू नये असे सांगत महापूजा शेतकर्‍याच्या हस्ते व्हावी अशी मागणी केली.
दरम्यान सोलापूरला आलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता त्यांनी मुख्यमंत्र्यांना महापूजेला येवू नका असे म्हणणे योग्य नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत व ते जबाबदारीने योग्य ते निर्णय घेत असतात. अशी पुष्टी देवेंद्र फडणवीस यांनी जोडली.

दरम्यान राज्यात शिवसेनाप्रणित महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्रिपदी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच विराजमान आहेत. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील ही पहिलीच आषाढी वारी आहे. नेमका याच काळात कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात व देशात वाढला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!