विठ्ठल मंदिरातील चिल्लरला बडोदा बँकेचा हात, 55 लाखाची नाणी स्वीकारली

पंढरपूर – येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती आखत्यारित मुख्य मंदिरातील 36 तर पंढरपूर शहर व परिसरात 28 परिवार देवता आहेत. येथे असणार्‍या दान पेट्यांमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात नाणी टाकतात. समितीकडे अशी 65 लाख रूपयांची नाणी पडून होती. यापैकी 55 लाख रूपयांची नाणी बँक ऑफ बडोदाच्या पिंपरी(पुणे) व पंढरपूर शाखेेने स्वीकारली आहेत.
2018 पासून बँकांनी जागेअभावी मंदिरातील नाणी स्वीकारण्यास असमर्थता दर्शविल्याने विठ्ठल मंदिरात एक कोटी रूपये चिल्लर स्वरूपात पडून होते. हे पैसे बँकेत जमा होत नसल्याने याचे व्याज ही समितीला मिळत नव्हते. यानंतर कॅनरा बँकेशी चर्चा करून दहा लाख रूपयांची नाणी त्यांच्याकडे जमा करण्यात आली. यासह तसेच काही नाणी टोलनाका ठेकेदार व भाविकांना विना कमिशन पुरविण्यात येत होती. मात्र तरीही पंढरीच्या या मंदिरात 65 लाख रूपयांची चिल्लर पडून होती. ज्यात दहा,पाच, दोन व एक रूपयांच्या नाण्याचा समावेश आहे.
मंदिरे समितीच्या सदस्या अ‍ॅड. माधवी निगडे यांनी बँक बडोदाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. या बँकेने नाणी स्वीकारण्यास होकार दिला असून आता पिंपरी शाखेत 30 लाख तर पंढरपूर शाखेत 25 लाख रूपयांची नाणी
जमा करण्यात आली आहेत. यामुळे आता मंदिरे समितीला याचे व्याज मिळू शकणार आहे. यासाठी समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखा अधिकारी सुरेश कदम, लेखा विभाग प्रमुख विनोद पाटील यांनी प्रयत्न केले आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!