विदेशातून मुंबईत परतले २ हजार ४२३ भारतीय, ७ जून पर्यंत आणखी १३ विमानं येणार
मुंबई – वंदे भारत अभियान अंतर्गत मुंबई विमानतळावर १७ विमानांतून २ हजार ४२३ भारतीय नागरिक काल (दिनांक २२ मे २०२०) पर्यंत विदेशातून परतले आहेत. पैकी ९०६ प्रवासी हे मुंबईतील रहिवासी आहेत तर उर्वरित महाराष्ट्रातील १ हजार १३९ आणि इतर राज्यातील ३७८ प्रवासी आहेत. दिनांक ७ जूनपर्यंत आणखी १३ विमानांनी विदेशातील भारतीय नागरिक परतणार आहेत.
दरम्यान, परतलेल्या नागरिकांपैकी मुंबईतील विविध ४३ हॉटेल्स्मध्ये मिळून सुमारे १ हजार १२८ नागरिकांना अलगीकरण व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जगभरात सुरू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना वंदे भारत अभियान अंतर्गत भारतात परत आणण्यात येत आहे. मुंबईत विशेष विमानांनी परतणाऱया नागरिकांसाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासनाने सर्व कार्यवाही आखली आहे. त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, महसूल विभाग, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ, बेस्ट प्रशासन आणि मुंबई विमानतळ या सर्व यंत्रणा समन्वयाने कामकाज करत आहेत.
यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री. मिलिंद बोरिकर यांच्या मार्गदर्शनाने अपर जिल्हाधिकारी श्री. विवेक गायकवाड, अपर जिल्हाधिकारी श्री. उद्धव घुगे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांची स्थापना करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी श्री. पद्माकर रोकडे व श्री. उमेश बिरारी यांच्यासह प्रत्येक पथकामध्ये १५ कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने महापालिका आयुक्त श्री. इ. सिं. चहल यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. मिलीन सावंत, संचालक (भूसंपादन) श्री. अनिल वानखडे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्री. भैयासाहेब बेहरे यांच्यासमवेत सुमारे ५० अधिकारी-कर्मचारी यांचे पथक दररोज यासंदर्भातील अंमलबजावणीवर देखरेख ठेवत आहेत.
केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करुन विशेष विमानांनी परत येणाऱया नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण (quarantine) केले जात आहे. प्रामुख्याने इतर जिल्ह्यातील व इतर राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. इतर जिल्हे व राज्यातील नागरिकांना त्यांचे संबंधित जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त यांच्यामार्फत अलगीकरण (कॉरंटाईन) केले जाणार आहे.
इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईत अलगीकरण व्यवस्थेमध्ये पाठवले जाते. वाहतूक परवाना संबंधित राज्याकडून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येते.
बृहन्मुंबईतील रहिवासी असलेल्या प्रवाशांसाठी संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल कॉरंटाईन) ची सुविधा म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने ८८ हॉटेलमध्ये मिळून ३,३४३ कक्ष आरक्षित केले आहेत.
प्रारंभी विमानतळावर आलेल्या प्रवाशांचे विमानतळ यंत्रणेमार्फत तपासणी (स्क्रीनिंग) करण्यात येते. त्यानंतर महसूल विभागनिहाय उपलब्ध असलेल्या टेबलवर जाऊन प्रवाशांना वाहतूक परवाना (ट्रॅव्हल पास) दिला जातो. हा परवाना घेऊन द्वार क्रमांक ४ येथे प्रवासी येतात. तेथून प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी वाहने पुरवतात. तर बृहन्मुंबईतील नागरिकांना बेस्ट बसेसमार्फत रवाना केले जाते. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळदेखील बसेस पुरवत आहे.
दिनांक १० मे रोजी लंडन येथून ३२६, सिंगापूरहून २४३ आणि मनिला येथून १५० नागरिक परतले. ११ मे रोजी सॅनफ्रान्सिको येथून १०७ आणि ढाका येथून १०७ जण आले. दिनांक १२ मे रोजी न्यू यॉर्क येथून २०८ तर क्वालालम्पूर येथून २०१ नागरिक परतले. दिनांक १३ मे रोजी शिकागो येथून १९५, लंडन येथून ३२७ तर कुवेत मधून २ जण आले. दिनांक १७ मे रोजी अदिस अबाबाहून ७८ तसेच काबूल येथून १२ जणांचे आगमन झाले. दिनांक १८ मे रोजी मस्कत येथून १६ जण, दिनांक १९ मे रोजी मनिला येथून ४१ जण मुंबईत आले. दिनांक २० मे रोजी मनिला येथून २९ प्रवासी, दिनांक २१ मे रोजी जकार्ता येथून १८५ प्रवासी तर काल २२ मे रोजी जोहान्सबर्गमधून १९६ जण मुंबई विमानतळावर उतरले आहेत.
यापुढे दिनांक ७ जूनपर्यंत जकार्ता, जोहान्सबर्ग, लंडन, मनिला, टोकियो, कोलंबो, मॉरिशस, नैरोबी आदी विदेशातील ठिकाणांहून मुंबईत भारतीय नागरिक परतणार आहेत.