सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी इंदोर संस्थानचे राजे भूषणसिंह होळकर मदत करणार

सोलापूर, दि.12- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यादेवींचे वंशज, इंदोर संस्थानचे राजे भूषणसिंह होळकर यांनी विद्यापीठास भेट देऊन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्यासमवेत चर्चा केली. यावेळी त्यांनी अहिल्यादेवींच्या भव्य पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याची ग्वाही कुलगुरु डॉ. फडणवीस यांना दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विद्यापीठ परिसरात भव्य पुतळा उभारण्यासाठी नियोजन सुरू आहे. त्यासाठी जागा निश्चितीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भूषणसिंह होळकर यांनी विद्यापीठास भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी कुलसचिव डॉ. विकास घुटे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम, अर्जुन सलगर, शिवाजी हळणवर, दिलीप माने, विनायक साळसकर आदी उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी भूषणसिंह होळकर यांचे स्वागत करून त्यांना विद्यापीठात उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.

भूषणसिंह होळकर म्हणाले की, देशाच्या इतिहासामध्ये एक उत्तम प्रशासक, पराक्रमी सेनानी, न्यायप्रिय व्यक्ती, त्याचबरोबर असंख्य जनकल्याणकारी कार्य करणारी लोकमता म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव अजरामर आहे. अशा या थोर स्त्रीरत्नांचे नाव आपल्या सोलापूर विद्यापीठास देण्यात आले आहे. त्यांचे कार्य, विचार हे नेहमीच विद्यापीठ प्रशासन, शिक्षक, विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहतील. येणाऱ्या काळामध्ये या विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक रत्न या देशांना मिळणार आहेत. ज्या थोर व्यक्तीचे नाव या विद्यापीठास देण्यात आले आ,हे त्यांचा एक भव्य पूर्णाकृती पुतळा या विद्यापीठ परिसरामध्ये दर्शनी ठिकाणी स्थापित करण्यात यावा, अशी इंदोर संस्थानची अपेक्षा आहे. या कार्यासाठी विद्यापीठास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत, असे भूषणसिंह होळकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

*समितीची 23 जूनला बैठक*

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्यासाठी सात जणांची एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक येत्या 23 जूनला विद्यापीठात पार पडणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. अहिल्यादेवींचा भव्य-दिव्य पुतळा उभारण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे डॉ. फडणवीस यांनी सांगितले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!