विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करा- अजित पवार

मुंबई – कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना घराबाहेर पडण्यास मुभा आहे, १४४ कलम लागू झालेले असतांना देखील काही लोक विनाकारण बाहेर फिरतांना दिसत आहेत . अशांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी आणि लोक विनाकारण घराबाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

अन्ननागरी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकिय शिक्षण, पोलीस, अन्न औषध प्रशासन , नगरविकास विभागाकडून येणाऱ्या देयकांचे पेमेंट तातडीने करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती ही त्यांनी दिली. खासगी आस्थापनांमध्ये, कारखान्यात काम करणााऱ्या कामगारांचे वेतन विशेषत: रोजंदारी कामगारांचे वेतन बंद करू नये असे आवाहन ही त्यांनी केले.

जनजागृती वाढावी- बाळासाहेब थोरात

जनजागृती वाढल्यास या कोरोना विषाणू विरुद्धचा लढा आपण यशस्वीपणे जिंकू शकू. त्यावर लक्ष देण्याची गरज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करावी, या विषाणुचा प्रसार झोपडपट्टयांमध्ये होणार नाही याची काळजी घेतली जावी असेही ते म्हणाले.

ब्लड कॅम्प आयोजित करण्याची गरज- राजेश टोपे

राज्यातील रुग्णालयात रक्तसाठा पुरेसा राहावा यासाठी मर्यादित स्वरूपात एकत्र येतील अशा पद्धतीने आणि आवश्यक ती सर्व काळजी घेऊन ब्लड कॅम्पचे आयोजन करण्याची गरज असल्याकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लक्ष वेधले.

जीवनावश्यक वस्तू पुरवठा सुरळित राहावा- सुभाष देसाई

सगळ्या प्रकारचे इंधन, कच्चामाल, बेकरी आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहाव्यात, ई कॉमर्स ला प्रोत्साहन देण्यात यावे असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले.

मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी शासनास सीएसआर अंतर्गत मिळत असलेल्या सहकार्याची माहिती दिली.

प्रभावी प्रशासनाची गरज- मुख्यसचिव

इफेक्टिव्ह पोलिसिंग आणि इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशनची गरज मुख्यसचिव अजोय मेहता यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, मंत्रालयात पॉलीसी कंट्रोल रुमची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येकाला काम वाटून देण्यात आले आहे. त्याप्रमाणे विभाग आणि जिल्हास्तरावरही कामाचे आणि जबाबदारीचे वाटप व्हावे. राज्यात १४४ कलम लागू झाले आहे. लॉकडाऊन आहे तरी लोक रस्त्यांवर फिरतांना दिसत आहेत. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी केली जावी असेही ते म्हणाले.

कुठल्याही जाती-धर्माच्या प्रार्थनास्थळावर गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक जिल्ह्याने ट्रान्सपोर्ट प्लान तयार केला पाहिजे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेतील कर्मचारी- अधिकारी यांना कामावर कसे येता येईल याची माहिती त्यांना दिली पाहिजे अशा सुचनाही त्यांनी दिल्या. ज्या खाजगी रुग्णालयात विलगीकरण वॉर्ड तयार करता येऊ शकतील त्यांना असे वॉर्ड तयार करण्याच्या सुचना देऊन त्यांची यादी मंत्रालयात पाठवली जावी असेही ते म्हणाले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!