वीजबिल माफीसाठी मनसे आक्रमक, सांगोल्यात आसूड मोर्चा
सांगोला, दि.17– राज्याचे उर्जामंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी लॉकडॉऊनकाळातील वीज बिल कमी करू तसेच यात दुरुस्त करू अशी आश्वासने दिली होती. मात्र तसे न घडता आता प्रत्यक्षात सर्वसामान्यांची वीज तोडणी सुरू झाली आहे. वीज तोडणारे सरकार जुलमी आहे. याच्या निषेधार्थ आम्ही आसूड ओढून महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिली.
टाळेबंदीनंतर सर्वसामान्य जनतेला आलेले भरमसाठ वीजबिल माफ करण्यात यावे, तसेच थकबाकीपोटी वीज तोडण्याचे काम महावितरणकडून जे सुरू आहे ते थांबवावे, या मागणीसाठी धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात महावितरणच्या कार्यालयासमोर आसूड मोर्चा काढण्यात आला. यावेळी महावितरणच्या अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
महावितरण जर जनसामान्यांच्या जीवावर उठत असेल तर मनसे धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर , शशिकांत पाटील ,अनिल केदार, भालचंद्र गोडसे ,अक्षय विभुते, अजिंक्य तोडकरी , विशाल गोडसे, खंडू इंगोले ,कृष्णदेव इंगोले, नागेश इंगोले, तेजस गांजले, शुभम काकडे यांच्यासह मनसैनिक आणि सामान्य नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.