वीज बिल माफीसाठी 29 जानेवारीला मनसेचा पंढरीत मोर्चा

पंढरपूर, – वीज वितरण विभागाने साखर कारखान्यांच्या माध्यमातून बिल वसुलीचा नवा फंडा अंमलात आणण्याचा विचार सुरु केला आहे. यास मनसेने तीव्र विरोध दर्शविला आहे. कारखान्यांनी वीज बिल वसुली करुन देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिला. दरम्यान 29 जानेवारी रोजी घरगुती आणि शेतीपंपाच्या थकीत वीजबिल माफीसाठी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
कोरोना काळातील वीज बिल वसुलीच्या मुद्द्यावरून आता मनसे आक्रमक होत असल्याचे चित्र आहे. पत्रकार परिषदेत बोलताना धोत्रे म्हणाले, कोरोना,अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच अनेकांचा रोजगार गेला आहे. शेतकर्‍यांचा माल शेतातच सडून गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनी आणि राज्य सरकारने शेती पंपाचे आणि घरगुती वापराचे बिल माफ करुन दिलासा देण्याची गरज आहे. उर्जामंत्री आणि सरकारमधील इतर विभागाच्या मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. मंत्रीच बिलोबाबत परस्पर विरोधी विधाने करु लागली आहेत.यामध्ये सर्वसामान्य लोकांची कोंडी झाली.
कोरोना काळात वीज बिलात सवलत देवू म्हणणारे सरकार आता वीज बिल भरा अन्यथा वीज पुरवठा बंद करु असा इशारा देत आहेत. संपूर्ण वीज बिल माफ करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंढरपुरातून आंदोलनाची हाक देत असून 29 जानेवारी रोजी हजारोंच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. बिलांची वसुली तातडीने थांबवावी अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल.असे दिलीप धोत्रे यांनी सांगितले.
यावेळी मनसेच्या वतीने पत्रकार दिन आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने पत्रकारांना तीळगुळ वाटप करुन सन्मान केला. यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष सिध्देश्‍वर गरड, नागेश इंगोले, प्रताप भोसले, प्रथमेश पवार, अनिल बागल,कृष्णा मासाळ महेश पवार,सागर बडवे, पुजारी, शुभम काकडे उपस्थि होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!