वीज बिल व महिला बचतगट कर्ज माफीसाठी मनसेचा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील बचत गटातील महिलांना मायक्रोफायनान्सचे कर्ज माफ करावे व राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या वतीने आज बुधवारी हुतात्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर आल्या होत्या. हलगीचा कडकडाट आणि बचत गटाचे कर्ज माफीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आज बुधवारी सोलापूर शहरातील हुतात्मा चौक येथून मनसेच्या मोर्चास प्रारंभ झाला. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यांकर, पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार रूपाली पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख , विद्यार्थी सेनेचे अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे,सरचिटणीस किशोर शिंदे, उपाध्यक्ष बाळा शेडगे, आशिष साबळे, विद्यानंद मानकर, बाळासाहेब सरवदे, सुभाष माने,अमोल झाडगे, राहुल अक्कलवडे, अभि रामपूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा सकाळी साडेअकराच्या सुमारास निघाला. सर्व महिलांच्या हातात विविध मागण्या लिहिलेले फलक व कार्यकर्त्यांच्या हाती भगवे झेंडे होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, वीज बिल माफ झाले पाहिजे, बचत गटाचे कर्ज माफ झाले पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा.. अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
हा मोर्चा हुतात्मा चौक येथून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिर परिसर रोड येथून जिल्हाधिकारी कार्यालया येथील पुनम गेट समोर आला. येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आले. महामोर्चा वेळीस पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसून आला.
सरकारला वीज बिल माफ करावेच लागेल
मागील आठ महिन्यापासून कोरोना महामारीमुळे हाहाकार माजलेला आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय बंद पडले त्यामुळे सर्वसामान्य सामान्य व अतिशय बिकट परिस्थिती ओढवली. रोजगारी हातातून गेला अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेतकरी सर्व बाजूंनी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत घरगुती औद्योगिक, शेतीची संपूर्ण वीज बिल माफ करावे व महिला बचत गटातील महिलांना मायक्रो फायनान्सचे संपूर्ण कर्ज माफ करावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. वीज बिल माफ हे सरकारला करावाच लागेल, नाहीतर लोक त्यांना माफ करणार नाही, शेवटी लोक निर्णय घेतील
-बाळा नांदगावकर,
..अन्यथा मनसेस्टाईलने उत्तर
सरकारने वीज बिल माफ करतो असे सांगितले होते पण ते केले नाही. त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. महिला बचत गटांना कर्जाचा तगादा लावू नका, सक्तीची वसुली करू नका असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. तरी देखील मायक्रो फायनान्सचे लोक त्रास देत आहेत. हे जर दोन दिवसात थांबले नाही तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ. बचत गटाचे पैसे आणि वीज बिल कोणीही भरू नये.
– दिलीप धोत्रे,, प्रदेश सरचिटणीस