वृध्द “माता-पित्याला” सन्मानाने त्यांच्या घराचा ताबा देण्याचे न्यायालयाचे “लेकाला व सुनेला” आदेश

सोलापूर – घरातून बाहेर काढलेल्या वृध्द आई- वडिलांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याबरोबरच त्यांना त्यांच्या घराचा ताबा देण्याचे आदेश दिवाणी न्यायाधीश व्ही. आय. भंडारी यांनी त्या वृध्दांच्या लेकाला व सुनेला दिले आहेत.
याबाबतची माहिती अशी की, सोलापूर शहरातील सम्राट चौक भाागताील महेशनगर येथे राहणारे कन्हैयालाल पुखराज भंडारी व चंपादेवी भंडारी यांना त्यांचा मोठा मुलगा गोविंद भंडारी व सून नम्रता यांनी भांडणे काढून घरातून बाहेर काढले होते. हे घर पुखराज भंडारी यांच्या स्वतःच्या मालकीचे होते व यातूनच मुलाने त्यांना बाहेर काढल्याने ते व्यथित झाले. यानंतर कन्हैयालाल व चंपादेवी या वृध्द दाम्पत्याने आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 च्या तरतुदीप्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करून मुलगा व सून आपला सांभाळ करीत नसून उलट स्वतःच्या मालकीच्या घरातून हकलून दिल्याबाबत अर्ज केला होता.
याबाबतची सखोल चौकशी करण्यात आली होती. त्यानुसार वृध्द आई- वडिलांच्या बाजूने उपविभागीय दंडाधिकारी यांनी निकाल देऊन निकाल दिलेल्या दिवसापासून दोन आठवड्यामध्ये ते घर खाली करून याचा ताबा वृध्द आई-वडिलांना देण्यासंबंधी आदेश दिला होता. या निकालाविरोधात मुलगा गोविंद व सून नम्रता यांनी दिवाणी न्यायालयात स्थगितीचा दावा दाखल केला होता. दिवाणी न्यायाधीश व्ही. आय. भंडारी यांनी सदरचा अर्ज फेटाळून लावला असल्याने आता त्या वृध्द आई-वडिलांना त्यांच्या मालकीच्या घरामध्ये जाऊन राहण्याचा मार्ग मोकळा झाला. या खटल्यात पुखराज भंडारी व चंपादेवी भंडारी यांच्यावतीने अ‍ॅड. सुनील बनसोडे यांनी काम पाहिले तर लेक व सून यांच्या बाजूने अ‍ॅड. निखिल येळेगावकर यांनी काम पाहिले.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!