पंढरीत शनिवारी 803 रॅपिड टेस्ट, 114 पॉझिटिव्ह ; लक्षण नसलेल्यांना घरीच उपचाराची सोय केल्याने चाचण्यांना प्रतिसाद

पंढरपूर -कोरोनाला रोखण्यासाठी पंढरपूर शहरात कडक संचारबंदीची अंमलबजावणी सुरू असून या दरम्यान शहरात व ग्रामीण भागात जेथे यापूर्वी मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळले आहेत तेथे रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट केल्या जात आहेत. याच अंतर्गत आज 803 टेस्ट घेण्यात आल्या असून यात 114 जण पॉझिटिव्ह आढळल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले आहे.
काल 7 ऑगस्टपासून संचारबंदीला सुरूवात झाली असून काल दिवसभरात झालेल्या टेस्टमध्ये 84 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते तर शनिवारी 114 रूग्णांची यात भर पडली आहे. काल परदेशी नगर, कॉटेज, करकंब, भाळवणी, शेगाव दुमाला, टाकळी रोड व कौठाळी भागात रॅपिडचे कॅम्प झाले होते तर आज शहरातील मनिषानगरसह विविध भागात तसेच ग्रामीणमध्ये कॅम्प घेण्यात आले आहेत.
संचारबंदी काळात मोठ्या प्रमाणात टेस्ट घेतल्या जात आहेत. एकाच दिवशी 803 टेस्ट झाल्या आहेत. गजानन महाराज मठात ही आज अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांच्या व नागरिकांच्या टेस्ट घेतल्या गेल्या आहेत. दरम्यान शहर व तालुक्यात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर ,उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके हे जास्तीत टेस्ट करून रूग्ण शोधण्याच्या कामात प्रयत्नशील आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन पंढरीत सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. यातच आता लक्षण नसलेल्या रूग्णांना घरात वेगळे राहण्याची सोय असल्यास त्यांना घरीच उपचाराची सोय करण्यात आल्याने शहरात या टेस्ट करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मनिषा नगरमध्ये आज सकाळी रॅपिड टेस्टसाठी रांगा लागल्या होत्या.
आज सकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर व तालुक्यात 115 रूग्ण आढळले होते. तर सायंकाळपर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये 114 नवे रूग्ण आढळले आहेत. यामुळे पंढरपूर ची कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराकडे वाटचाल करत आहे. आज सकाळ पर्यंत एकूण 866 रूग्ण संख्या होती यात आता 114 ची भर पडली आहे . यामुळे आता शनिवार सायंकाळ पर्यंत 980 रुग्ण झाले आहेत.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!