शहीद धनाजी होनमाने अनंतात विलीन

पंढरपूर – गडचिरोली जिल्ह्यामधील भामरागड तालुक्यातील पोरयकोटी- कोरपर्शी जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी मूळ गावी पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथे शासकीय इतमामात आणि भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुळूज ग्रामस्थांनी व उपस्थितांनी साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला.
कोरोना विषाणूमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत येथील गावकरी शहीद धनाजी होनमाने यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते.दुपारी साडेबारा वाजता शहीद पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आले. येथे अंत्यदर्शन घेतल्यानंतर पार्थिव अंत्यसंस्कारस्थळी आणण्यात आले. यावेळी शहीद धनाजी होनमाने यांचे मोठे बंधू विकास होनमाने यांनी अग्नी दिला. याप्रसंगी उपस्थितीतांनी अमर रहे.. अमर रहे, धनाजी होनमाने अमर रहे..च्या घोषणा दिल्या.
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदारद्वय भारत भालके, यशवंत माने यांनी शहीद धनाजी होनमाने यांच्या कुटुबियांची भेट घेवून सांत्वन केले. शासनाच्या वतीने श्रध्दांजली वाहिली. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद होनमाने यांनी दाखविलेले शौर्य महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. त्यांच्या बलिदानाची जाणीव प्रत्येकाला राहील, अशा शब्दांत भरणे यांनी श्रध्दांजली वाहिली. शासनाकडून शहीद होनमाने यांच्या कुटुंबाला 1 कोटी 38 लाख रूपयांची मदत दिली जाणार असून त्यांच्या बंधूना शासकीय सेवेत सामावून घेण्यात येईल तसेच त्यांच्या माता पित्यांना पेन्शन दिली जाईल असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसीलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, पोलीस निरीक्षक किरण अवचर ,अरुण पवार, भस्मे यांनी पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.
पोलीस दलांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक सुहास वारके यांनी शासनाच्या आणि पोलीस दलांच्या वतीने शोकसंदेश वाचून दाखवला.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!