शिवसेना व भाजपात तीव्र राजकीय संघर्ष , अतिवृष्टीच्या पाहणी दौर्‍यातही एकमेकांवर टीकास्त्र..

पंढरपूर, – सोलापूर जिल्हा अतिवृष्टीग्रस्त असून अजूनही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने येथील जनता अगोदरच भीतीने गोरठून गेली असताना सत्ताधारी शिवसेना व विरोधक भाजपामधील राजकीय संघर्ष नुकसानग्रस्त पाहणी दौर्‍यात देखील कमी होण्यास तयार नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील गारअकोले येथे पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांचा थिल्लरपणा सुरू आहे..अशा शब्दात टीकास्त्र सोडले.
मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना व भाजपाची सत्ता महाराष्ट्रात आली खरी मात्र शिवसेनेने मैत्रीचा हात मागे घेत निवडणूकपूर्व झालेली युती निकालानंतर तोडली व दोन्ही काँग्रेसला बरोबर घेवून सत्ता स्थापन केली तेंव्हापासून शिवसेना व भाजपात सतत राजकीय संघर्ष सुरू आहे.
अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्हे नुकसानग्रस्त झाले आहेत. याची पाहणी सोमवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली व योगायोग असा की याच दिवशी विधानसभेचे व विधानपरिषदेचे दोन्ही विरोधीपक्षनेते सोलापूर जिल्हा दौर्‍यावर आले. सकाळीच बारामतीत पाहणी करताना फडणवीस यांनी केंद्राच्या मदतीवरून राज्य सरकारवर निशाणा साधला होता. केंद्राची मदत मिळेलच पण राज्य सरकार येेथील नुकसानग्रस्त जनतेला काय मदत देणार असा सवाल त्यांनी विचारला होता. हाच प्रश्‍न पत्रकारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सोलापूरमध्ये विचारला असता त्यांनी केंद्राची मदत देण्याचा प्रस्ताव दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी यांनीच ठेवला असून त्यांनीच आपल्याला फोन करून परिस्थितीची माहिती घेतल्याचे सांगत. केंद्र सरकार हे कोणा पक्षाचे नसते तर ते देशाचे असते असे सांगत फडणवीस यांना टोला लगावत विरोधी पक्षनेते प्रचारासाठी बिहारला जातात तसे त्यांनी नवी दिल्लीत जावे व आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी प्रयत्न करावेत अशी शाब्दिक चिमटा काढला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री व आताचे विरोधीपक्ष नेते आहेत. ते जबाबदार राजकारणी आहेत. आपल्याला जनतेला दिलासा देण्याचे काम करायचे असून राज्य व केंद्र सरकार काय करते यापेक्षा आपल्या राज्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. राज्य नैसर्गिक आपत्तीत असताना सर्वांनी एकत्रित येवून जनतेला मदत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे स्पष्ट केले.
दरम्यान तोवर फडणवीस हे सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले व माढा तालुक्यातील गारअकोले येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची तोफ झाडत मुख्यमंत्र्यांना असा थिल्लरपणा शोभत नाही. आता कसेतरी ते बाहेर पडले आहेत त्यांनी स्वतःची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांशी करू नये.. सरकार चालवयाला दम लागतो..अशा शब्दात शाब्दिक हल्ला चढविला.
ते म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे संवेदनशील परिस्थितीत अतिशय थिल्लरपणा करत असून इतक्या दिवसातून आज दोन ,तीन तासासाठी बाहेर आले आहेत. त्यांनी स्वतःची मोदी साहेबांशी तुलना करू नये. केंद्र सरकारने राज्याचे कोणतेही पैसे थकवले नाहीत. राज्याचे जीएसटी कमी जमा झाल्याने त्याची भरपाई केंद्र सरकार करून देत आहे. केंद्र सरकारने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे. आता लोकांना मदतीची गरज आहे अशा वेळी केंद्राकडे बोट दाखवण्याऐवजी राज्य सरकारने स्वतःही काही मदत केली पाहिजे. राज्यांच्या जीएसटीचे पैसे देण्यासाठी केंद्र सरकारने कर्ज काढले आहे. असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. ते जनतेची दिशाभूल करीत असून मला अर्थशास्त्र चांगले कळते असे सांगत महाराष्ट्र सरकारने 50 हजार कोटींचेच कर्ज घेतले आहे. आणखी 70 हजार कोटी रूपये कर्ज काढण्याची क्षमता आहे. कर्ज काढा पण शेतकर्‍यांना मदत करा. आमच्या काळात शेतकर्‍यांना आपत्तकालीन स्थितीत केंद्राच्या मदतीची वाट न बघता आम्ही 10 हजार कोटी मदत केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!