शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खते व बियाणे उपलब्ध करुन द्यावीत- कृषी मंत्री दादाजी भुसे

पुणे दि.29- खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते कमी पडू नयेत, यासाठी आवश्यकतेनुसार या निविष्ठा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधापर्यंत खते व बी-बियाणे उपलब्ध करुन द्यावीत, असे निर्देश कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

खरीप हंगाम २०२० नियोजनाबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी पुणे विभागाचा जिल्हानिहाय आढावा घेतला. बैठकीला कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषि सह संचालक दिलीप झेंडे, दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, जिल्हा अग्रणी बँकेचे अग्रणी व्यवस्थापक आनंद बेडेकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कृषी आयुक्त सुहास दिवसे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर चे जिल्हाधिकारी अनुक्रमे मिलिंद शंभरकर, डॉ. अभिजीत चौधरी, दौलत देसाई, साताऱ्याचे अपर जिल्हाधिकारी, तसेच या सर्व जिल्ह्यातील पोलीस, कृषी, सहकार विभागाचे व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले. यावेळी या जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी खरीप हंगामाबाबत विविध सूचना केल्या.
श्री. भुसे म्हणाले, खरीप हंगामासाठी कृषी क्षेत्राशी संबंधित कोणत्याही बाबींची अडचण शेतकऱ्यांना येणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणारा कापूस, तूर, मका, ज्वारी, हरभरा आदी शेतमाल येत्या 15 जून पर्यंत खरेदी करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करावी. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचाच माल येत असल्याची पडताळणी करावी.
कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांनी शेतमाल व फळपिके नागरिकांना कमी पडू दिले नाही. यात बळीराजाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे गौरवोद्गगार काढून श्री. भुसे म्हणाले, या काळात शेतकऱ्यांचा 2 हजार टन शेतमाल ग्राहकांपर्यत पोहोचविण्याचे काम कृषी विभागाने केले आहे. या कामाचे कौतुक करुन येणाऱ्या काळात कृषी क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले. लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांना शेती कामासाठी जाण्या-येण्यास तसेच शेतीसाठी आवश्यक वाहनांना इंधनपुरवठा करण्यासाठी कोणतीही अडचण येवू देवू नये, अशा सूचना त्यांनी पोलीस विभागासह संबंधित सर्व यंत्रणांना दिल्या.

शेतीसाठी युरियाचा 50 हजार मेट्रिक टन साठा राज्यात उपलब्ध आहे. तथापि जमिनीचा पोत चांगला राहण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक तेवढाच व कमीत कमी युरियाचा वापर करावा, असे सांगून याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून घरचे बियाणे वापरण्याबाबतही त्यांना प्रोत्साहन द्यावे, असेही श्री. भुसे म्हणाले. शेतकऱ्यांच्या बांधावर आतापर्यंत 96 हजार 900 मेट्रीक टन रासायनिक खते तसेच 46 हजार 655 क्विटंल बियाणे पोहोचवण्यात आली आहेत. या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे कृषी मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

विभागातील सर्व जिल्ह्यांच्या पीक कर्जाचा आढावा घेवून ते म्हणाले, पीक कर्ज वितरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा. त्याच बरोबर शेतकऱ्यांना हे कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावे. पीक कर्ज टाळाटाळ करणाऱ्या बँकाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
कोरोना काळात बँकांमध्ये गर्दी होवू नये, यासाठी पीक कर्ज मागणीसाठीचा एक पानी अर्ज बँकेमध्ये ऑनलाईन सादर करुन त्यावर कार्यवाही करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्याच्या दृष्टिने कृषी विभागाच्या वतीने आजपासून यु टयुब चॅनल सुरु करण्यात आले असल्याचे सांगून कृषी तज्ज्ञांनी आजवर 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला आहे, असेही श्री. भुसे यांनी सांगितले. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचे अधिकाधिक क्षेत्र ठिबक सिंचनाखाली येण्यासाठी प्रयत्न करावेत. ठिबक सिंचनाद्वारे ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासन व साखर कारखान्यांनी प्रोत्साहनपर उपक्रम राबवावेत, असेही श्री. भुसे यांनी सांगितले.

खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज
–राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम

राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, लॉकडाऊनमुळे शेतीशी निगडीत कोणतीही कामे अडू नयेत, यासाठी शेतकऱ्यांनी सोशल डिस्टंन्सिंग व आवश्यक ती खबरदारी घेवून ही कामे करण्यासाठी शासनाने शिथिलता दिली आहे. यापुढेही शेती विषयक कामे सुरु ठेवण्यास कोणतीही अडचण येणार नाही. खरीप हंगामाच्या दृष्टिने कृषी विभागाने योग्य ते नियोजन केले असून यासाठी शासनाचा कृषी विभाग सज्ज आहे,असे राज्य मंत्री डॉ. कदम म्हणाले, शेतकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. सांगली जिल्ह्यात द्राक्ष पिकाचे उत्पादन मुबलक प्रमाणात होते. याचा विचार करुन सांगली जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीसाठी उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती डॉ. कदम यांनी यावेळी दिली .

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, कोरोनामुळे कृषीक्षेत्राशी निगडीत विषय प्रलंबित राहू नयेत, याची दक्षता घेवून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संयुक्तपणे वेळोवेळी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आढावा घेण्यात येत आहे. तसेच नियोजन करुन खरीप हंगामासाठीची कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील, अशी हमी दिली. तसेच जिल्ह्यातील बियाणे व खतांची उपलब्धता आवश्यक बियाणे व खते, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, शासकीय खरेदी केंद्रे आदीबाबत माहिती दिली.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!