श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे मंगळवारी श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान
पंढरपूर दि . १० – कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरहून श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे मंगळवार दि . १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान होत आहे . श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने ह भ प विठ्ठल महाराज वासकर यांच्या दिंडी सोहळ्या समवेत श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे . मंगळवारी सकाळी ११ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री पांडुरंग पादुकांची विधीवत प्रस्थान पूजा केली जाईल . त्यानंतर आरती होईल व मंदिरे समितीच्या वतीने मानक-यांचा सन्मान केला जाईल . कीर्तन मंडपातून दुपारी १ वाजता हा पालखी सोहळा वाखरी मार्गे पहिल्या भंडीशेगाव मुक्कामासाठी मार्गस्थ होईल . बुधवार दि . १३ रोजी दुपारी वेळापूर , रात्री खुडूस , गुरुवार दि . १४ रोजी दुपारी नातेपुते रात्री धर्मपुरी , शुक्रवार दि . १५ रोजी दुपारी पिंपरद रात्री फलटण , शनिवार दि . १६ रोजी दुपारी तरडगांव रात्री लोणंद , रविवार दि . १७ रोजी दुपारी नीरा रात्री वाल्हे , सोमवार दि . १८ रोजी दुपारी यमाई शिवरी रात्री सासवड , मंगळवार दि . १९ रोजी दुपारी फुरसुंगी रात्री डेक्कन जिमखाना , पुणे , बुधवार दि . २० रोजी दुपारी थोरल्या पादुका तर रात्री श्री क्षेत्र आळंदी मुक्कामी हा सोहळा पोहोचेल . श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचा श्री क्षेत्र आळंदी येथे पाच दिवस मुक्काम आहे . शुक्रवार दि . २२ रोजी श्रींच्या पादुकांना इंद्रायणी स्नान , शनिवार दि . २३ रोजी पालखीची नगर प्रदक्षिणा , सोमवार दि . २५ रोजी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजिवन समाधी सोहळा झाल्यानंतर हा सोहळा मंगळवार दि . २६ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र पंढरपूरकडे परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ होइल . शुक्रवार दि ६ डिसेंबर रोजी हा सोहळा श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये पोहोचेल . या पालखी सोहळा प्रस्थानाची व प्रवासाची संपूर्ण व्यवस्था श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव , व्यवस्थापक बालाजी पुदलवाड , लेखाधिकारी सुरेश कदम , पालखी व्यवस्थापक मयूर ननवरे , पूजा व्यवस्थापक संजय कोकीळ व अतुल बक्षी यांनी केली आहे . श्री विठ्ठल भक्तांसाठी पालखी सोहळ्यात दुपारी मुक्कामाच्या ठिकाणी रु . २५१ भरुन श्री पांडुरंगाची पाद्यपूजा करण्याची सुवर्ण संधी मंदिरे समितीच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आली आहे .