श्री विठ्ठल आणि भाविकांमधील ऑनलाइन पासचा अडसर दूर , बुकींग न करता येणाऱ्यांनाही मिळणार दर्शन

पंढरपूर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात भाविकांसाठी ऑनलाइन बुकींग मुखदर्शनाची सोय करण्यात आली असून आता 12 जानेवारीपासून 8 हजार भाविक याचा लाभ घेवू शकतील. यापूर्वी 4800 जणांना रोज दर्शनाचे पास मिळत होते. यात आता वाढ करण्यात आली. दरम्यान 20 जानेवारीपासून जे भाविक ऑनलाइन बुकींग न करता दर्शनाला येतील त्यांनाही ओळखपत्र (आधारकार्ड व अन्य) पाहून कोरोनाविषयक आरोग्य नियमांचे पालन करून श्रींचे मुखदर्शन देण्याचा निर्णय मंदिरे समितीने आपल्या बैठकीत घेतला आहे.

कोरोनामुळे पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर मार्च ते 15 नोव्हेंबर 2020 या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी बंद होते. दिवाळी पाडव्याला मुखदर्शन सुरू करण्यात आले. सुरूवातीला एक हजार भाविकांना केवळ दर्शन मिळत होते. ही संख्या वाढवून आता 4800 करण्यात आली आहे. मात्र या महिन्याच्या सुरूवातीचे दोन दिवस वगळत अन्य दिवशी तीन ते साडेतीन हजार भाविकच रोज दर्शन घेत आहेत. यात अनेकांना ऑनलाइन दर्शन पासाची माहिती नसल्याने ते येथे येतात मात्र श्रींच्या दर्शनापासून वंचित राहतात. अशा अनेक भाविकांनी त्यांना बुकींग नसले तरी येथे आल्यावर दर्शनाची सोय करावी अशी मागणी केली होती.

आता मंदिरे समितीने ऑनलाइन बुकींग दर्शनाची रोजची संख्या आठ हजार केली आहे तर जे भाविक बुकींग न करता पंढरपूरला येतील त्यांना ही ओळखपत्र पाहून मुखदर्शन देण्याची व्यवस्था 20 जानेवारीपासून केली आहे. मात्र दहा वर्षाखालील मुले, 65 वर्षांवरील वृध्द तसेच गर्भवती महिला व आजारी व्यक्ती यांना प्रवेशबंदी असणार आहे.

सोमवारी मंदिरे समितीची जी बैठक पार पडली यास सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य संभाजीराजे शिंदे, ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, प्रकाश जवंजाळ, नगराध्यक्षा साधना भोसले ,लेखाधिकारी सुश कदम उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!