संक्रांतीला महिलांसाठी विठ्ठल रूक्मिणीच्या मुखदर्शनाची मंदिरे समितीने केली सोय ; वाणवसा करण्यास परवानगी नाही
पंढरपूर – संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारी रोजी महिला भाविकांची मागणी लक्षात घेता श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने सायंकाळी सहा ते दहा यावेळेत ऑनलाइन बुकींग न करताही मुखदर्शनाची सोय करण्यात आली आहे. यासाठी ओळखपत्र आवश्यक असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाणवसा करण्यास कोणत्याही भाविकाला परवानगी मिळणार नसून वाणवसाचे साहित्य मंदिरात घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
याबाबत मंदिरे समितीने बैठकीत निर्णय घेतला आहे. मकरसंक्रांतीला महिला भाविक वाणवसा करण्यासाठी तसेच श्री विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी मंदिरात मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाणवसा करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. सध्या श्रींचे पदस्पर्श दर्शन बंदच आहे. मुखदर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग केले जात आहे. संक्रांतीला सायंकाळी सहा ते दहा या कालावधीत विना बुकिंग ओळखपत्र दाखवून दर्शनासाठी कासार घाट येथून सोडले जाणार आहे. दहा वर्षाखालील मुले, 65 वर्षांवरील वृध्द तसेच गर्भवती महिला व आजारी व्यक्ती यांना प्रवेशबंदी आहे.