संजय शिंदे राष्ट्रवादीत, महाआघाडीच्या अन्य नेत्यांची भूमिका काय ?

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हे आज शुक्रवारी दुपारी चार वाजता बारामती येथे खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करीत असून त्यांना माढा लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपात सामील होण्याच्या निर्णयानंतर त्यांचे राजकीय विरोधक असणारे संजय शिंदे हे निश्‍चितपणे बारामतीचा रस्ता धरणार हे सारेच जाणून होते आणि प्रत्यक्षात तसेच घडत आहे. मोहिते पाटील यांच्या विरोधात जिल्ह्यात जी महाआघाडी भाजपाच्या पाठिंब्याने तयार करण्यात आली होती यातील अन्य नेत्यांची भूमिका काय असणार ? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.
संजय शिंदे यांचे राजकारण पाहिले तर त्यांनी कोणत्याच पक्षाला जवळ केले नव्हते. विधानसभा असो की जिल्हा परिषद निवडणुकीत ते दिसून आले होते. शिंदे हे पवार काका पुतण्यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोहिते पाटील यांच्या विरोधात जो गट तयार झाला होता यात शिंदे यांच्या बरोबरीने आमदार प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश होता. या मंडळींनी अकलूजला डावलून थेट बारामतीशी संपर्क वाढविला होता. 2014 ला विधानसभा निवडणुकीत शिंदे व परिचारक यांनी वेगळी भूमिका घेत पक्षापासून दूर जात भाजपाप्रणित महायुतीची साथ घेतली मात्र त्यांना करमाळा व पंढरपूरमध्ये पराभूत व्हावे लागले होते. त्यावेळी मोहिते पाटील गटाने शिंदे व परिचारकांच्या विरोधात या दोन विधानसभा मतदारसंघात त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मदत केली होती. करमाळ्यात आमदार नारायण पाटील जे शिवसेनेचे आहेत ते विजयी झाले तर पंढरपूर- मंगळवेढ्यात काँगे्रसचे भारत भालके हे दुसर्‍यांदा आमदार झाले.
2009 ला भारत भालके यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचा पंढरपूर मतदारसंघात पराभव केला मात्र यानंतर मोहिते व भालके यांच्यात दोस्ताना झाला व परिचारक गटाशी राजकीय खुन्नस निर्माण झाली जी आज ही कायम आहे. यानंतर शिंदे व परिचारक यांनी राज्यात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाशी जवळीक साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ घेतली. 2015 ला प्रशांत परिचारक यांना विधानपरिषदेसाठी महायुतीने पाठिंबा दिला. संजय शिंदे व उमेश परिचारक यांनी जोरदार फिल्डींग लावत काँगे्रस व राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक साळुंखे यांचा पराभव केला. वास्तविक पाहता येथे दोन्ही काँगे्रसचे संख्याबळ अधिक होते. यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाच्या पाठिंब्याने महाआघाडी स्थापन करण्यात आली व या माध्यमातून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद संजय शिंदे यांनी मिळविले. वास्तविक पाहता राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असताना ही शिंदे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली व विशेष म्हणजे त्यावेळी अध्यक्षपदासाठी मतदान झालेच नाही.
जिल्ह्यात विधानपरिषदेला दोन्ही काँग्रेसचे संख्याबळ जास्त असताना भाजपाच्या पाठिंब्यावर नशीब आजमाविणार्‍या प्रशांत परिचारक यांना आमदारकी मिळते तर दुसरीकडे जिल्हा परिषदेत ही संजय शिंदे हे अध्यक्ष होतात. यावरून बरेच काही राजकारण झाल्याचे दिसत होते.
संजय शिंदे यांनी महाआघाडीच्या स्थापनेनंतर सर्वच पक्षांना सुरक्षित अंतरावर ठेवल्याचे दिसत होते. त्यांनी कधी ही भाजपाचे उदो..उदो केले नाही तर राष्ट्रवादीशी जवळीक ठेवली नाही. शरद पवार अथवा अजित पवार माढा तालुक्यात आल्यावर त्यांचे स्वागत करण्याची भूमिका कायम ठेवली तर दुसरीकडे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी आपले मैत्रीपूर्वक संबंध जपले. मुख्यमंत्र्यांनी मदत केली म्हणून त्यांनी भाजपात प्रवेश केला नाही.
दरम्यानच्या काळात महायुतीच्या या सत्ता काळात आमदार प्रशांत परिचारक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध अत्यंत स्नेहपूर्वक राहिल्याने परिचारक यांनी नगरपरिषद असो की पंचायत समिती व जिल्हा परिषदेत भाजपाला जागा सोडल्या. यामुळे येथे कमळाचे नगरसेवक, पंचायत व जिल्हा परिषद सदस्य ही विजयी झाले आहेत. परिचारक भाजपाच्या बैठकांना हजेरी लावत असल्याचे चित्र आहे. नुकतीच सोलापूर लोकसभेची बैठक झाली यात आमदार परिचारक उपस्थित होते.
शिंदे व परिचारक ही जिल्ह्याच्या राजकारणातील नावाजलेली जोडी असून यातील संजय शिंदे हे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर चालल्याने सहाजिकच परिचारकांची भूमिका आता काय असणार ? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. परिचारक हे जिल्ह्याचे आमदार असल्याने त्यांची भूमिका सोलापूर व माढा मतदारसंघात महत्वपूर्ण मानली जाते. याच बरोबर महाआघाडीतील अन्य नेत्यांसमोर ही आता मैत्री की पक्ष असा नवा पेच निर्माण होताना दिसत आहे. सांगोल्याचे शहाजीबापू पाटील, माळशिरसचे उत्तम जानकर, बार्शीचे राजेंद्र राऊत, मोहोळचे विजयराज डोंगरेे हे या महाआघाडीतील काही प्रमुख नेते आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!