संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा घरीच साजरा करण्याचे आवाहन
पंढरपूर – श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराजांचा 670 वा संजीवन समाधी सोहळा शनिवार दि. 18 जुलै रोजी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली असून शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून वारकरी, भाविक व शिंपी समाज बांधवांनी आपापल्या घरीच धार्मिक कार्यक्रम व पूजन करावे असे आवाहन संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांनी केले आहे.
संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा संत नामदेव मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे. मात्र यावर्षी संपूर्ण जगात व देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. तरी सर्व शिंपी समाज बांधव, वारकरी, भाविक व फडकरी मंडळींनी आपापल्या घरीच संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करावा. आपल्या घरीच संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, आरती करून पसायदान म्हणावे व नैवेद्य दाखवावा.
तसेच ज्याठिकाणी मठ, मंदिरात समाधी सोहळा साजरा केला जातो तेथे भाविक, नागरिकांना न बोलवता फक्त पुजारी व मानकर्यांनी धार्मिक विधी करून पूजन करावे. सर्व नागरिकांनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून कोरोना रोगाला अटकाव घालावा.
संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या संत नामदेव मंदिर येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोणालाही प्रवेश न देता फक्त महाराज मंडळींच्या उपस्थितीत भजन, कीर्तन, प्रवचन आंदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मुख्य कार्यक्रमाच्या अंतर्गत गुरुवारी एकादशी दिवशी नामदास महाराज व फक्त 3 सेवेकर्यांनी दिंडी काढून नगर प्रदक्षिणा केली. शनिवार दि. 18 रोजी संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. या दिवशी पहाटे व दुपारी श्री केशवराज, संत नामदेव-जनाबाई यांची महापूजा मानकर्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आधारित नामदास महाराजांचे कीर्तन होणार आहे. रविवारी संत सावता माळी यांच्या समाधी सोहळ्याचे कीर्तन होणार आहे. तसेच मावस्ये दिवशी सोमवार दि. 20 रोजी काल्याचे कीर्तन व सायंकाळी मंदिरातच पालखी सोहळा होणार आहे. समाधी सोहळा कार्यक्रमासाठी सर्वश्री ह.भ.प. केशव महाराज, कृष्णदास महाराज, माधव महाराज, मुकुंद महाराज, ज्ञानेश्वर महाराज नामदास यांच्यासह विठ्ठल, एकनाथ, मुरारी, निवृत्ती, हरी, भावार्थ महाराज व नामदास परिवार परिश्रम घेत आहे.
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे…….
संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त समस्त नामदेव शिंपी समाजाच्यावतीने दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तरी सर्व शिंपी समाज बांधव, वारकरी भाविकांनी आपल्या घरीच संजीवन समाधी सोहळा साजरा करावा. तसेच प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करून कोरोनाला हद्दपार करावे, असे आवाहन शिंपी समाजाचे अध्यक्ष गणेश उंडाळे, युवक संघटनेचे अध्यक्ष शैलेश धट यांनी केले आहे.