संसर्ग लपवू नका, लक्षणं जाणवत असल्यास तपासणी करून घ्या : प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे आवाहन

पंढरपूर, – वाखरी येथील कोविड केअर सेंटरमधून रविवारी एकाच दिवशी 56 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. येथे आता 157 जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान सध्याचे वातावरण हे संसर्गजन्य आजारांना पोषक असल्याने कोणाही नागरिकाला आपल्यात आजाराची लक्षण वाटत असल्यास त्यांनी तातडीने तपासणी करून घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
वाखरीच्या कोविड केअर सेंटरमधून एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात रूग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. दरम्यान येथे उपचारानंतर बरे होणार्‍या रूग्णांचे प्रमाण जास्त आहे. रविवारी कोरोनावर मात केलेल्यांना निरोप देण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, डॉ. विजय सरडे, डॉ. जानकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रांताधिकारी ढोले म्हणाले, पंढरपूरच्या या कोविड सेंटरमध्ये येथील सर्वच स्टाफ व अधिकारी रूग्णांची अतिशय चांगल्या पध्दतीने काळजी घेत असल्याने येथे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. सध्याचे वातावरण पाहता ते संसर्गजन्य आजारांना पोषक असे असल्याने कोणाही नागरिकाला आजाराची लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी आपला संसर्ग न लपविता समोर येवूून तपासणी करून घ्यावी. कारण संसर्ग असल्यास तातडीने उपचार करता येणे शक्य होते. या आठवड्यापासून आता जास्तीत जास्त रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट केल्या जाणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. तीन ते चार हजार टेस्ट येथे होतील. यामुळे संसर्गबाधित रूग्ण शोधून तातडीने त्यांच्यावर उपचार करणे सोपे जाणार आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले म्हणाले, येथे 213 रूग्णांवर उपचार सुरू होते.यापैकी आज 56 जणांना घरी पाठविण्यात आल्याने आता 157 रूग्ण येथे आहेत. दरम्यान जे मृत्यू होत आहेत याचे कारण म्हणजे सारी या आजारात रूग्ण उशिरा येथे दाखल होत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ही पुरेसा वेळ मिळत नाही. यासाठी आता नागरिकांनी आणखी सतर्क राहून सर्व आरोग्यविषयक घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सिंग पाळावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!