सकाळी रणजितसिंह महाजनांच्या तर रात्रौ संजयमामा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
चर्चेला ऊत, रणजितसिंहांची भेट राजकीय नसल्याचा निर्वाळा
माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजपाचा उमेदवारीचा तिढा सुटता सुटत नसून सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथून उमेदवारी नाकारल्यानंतर ज्या रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नाव या जागेसाठी सर्वात पुढे होते त्यांनी मंगळवारी मुंबईत सुजय विखे यांच्या निवासस्थानी भाजपाचे ताकदवान नेते व मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवून खळबळ उडवून दिली. यामुळे मोहिते पाटील हे भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. तर दुसरीकडे आता पवार माढ्याचे उमदेवार नसल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या समोरील अडचणी संपल्याने त्यांची रात्रौ उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर माढ्याच्या उमेदवारीवरून चर्चा होणार असल्याचे समजते.
दरम्यान कारखान्याच्या कामासंदर्भात रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदामंत्र्यांची भेट घेतल्याचा खुलासा नंतर करण्यात आला आहे. दरम्यान ज्या सुजय विखेंबरोबर मोहिते पाटील आज दिसत होते त्या विखेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. गेले काही दिवस गिरीश महाजन व विखे यांच्यात चर्चा होत होती. अखेर आज त्यांचा भाजपा प्रवेश झाला. यामुळे महाजन व रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीला राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. भेटीची जागा व वेळ अत्यंत महत्वपूर्ण होता. यातून अनेक राजकीय अर्थ निघाले आहेत.
माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी चांगले काम करून ही त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा विचार न करता थेट पवार यांनाच माढ्यात आमंत्रित करण्यात आल्याने मोहिते पाटील समर्थक नाराज होते. आता पवार उमेदवार नसल्याने पुन्हा मोहिते पाटील पिता पुत्रांचे नाव पुढे आले आहे. मात्र आजच्या गिरीश महाजन व रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. महाजन यांच्याच मध्यस्थीने काँग्रेसचे मातब्बर नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपात आले आहेत. महाजन हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात.
दरम्यान शरद पवार यांनी माढ्यातून न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील भाजपा प्रणित महाआघाडीने सुटकेचा श्वास सोडला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे व आमदार प्रशांत परिचारक हे पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. जर पवार येथून उमदेवार असते तर शिंदे व परिचारकांसमोर पेच निर्माण झाला असता. आता पवारांनी उमेदवारी नाकारल्यानंतर संजय शिंदे हे माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार असू शकतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना मंगळवारी रात्री मुंबईत चर्चेसाठी बोलाविले असून ते यासाठी रवाना झाले आहेत. दरम्यान तत्पूर्वी त्यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे.