सरकारने शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे मोफत वाटप करण्याची मागणी
पंढरपूर,ता.7ः यावर्षी राज्यात मान्सूनपूर्व पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतु कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. अशा वेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे मोफत वाटप करावे अशी, मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केली आहे . या संदर्भात त्यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना लेखी निवेदन पाठविले आहे.
मागील दोन वर्षापासून दुष्काळ,महापूर आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके बांधावर टाकून द्यावी लागली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.अशा संकट काळात राज्य सरकारने जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.
यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने राज्यात सर्वत्र समाधानकारक हजेरी लावली आहे. खरीप पेरणीसाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरला आहे. सध्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. परंतु शेतकऱ्यांकडे शेती मशागतीबरोबरच बियाणे व खतांसाठी पैसे नसल्याने यावर्षी खरीप पेरणी कशी करायची अशी शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.
ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफीचा निर्णय घेतला आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना अजूनही याचा लाभ मिळाला नाही.त्यातच शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने खरीप पेरणीसाठी बियाण्यांसह खतांचे मोफत वाटप करुन शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणीही मनसे श्री. धोत्रे यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, सिद्धेश्वर गरड, सागर घोडके,महेश पवार, उपस्थित होते