सर्व संबंधितांशी विचार केल्यानंतर जिल्ह्यात लॉकडाऊनबाबत निर्णय : पालकमंत्री
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, अकलूज येथे घेतली आढावा बैठक
पंढरपूर,दि.9- कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात संचारबंदी लागू करावी (लॉकडाऊन) अशी मागणी जोर धरु लागली आहे. मात्र याबाबत सर्व संबंधितांशी विचार विनिमय करुनच निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी माळशिरस तालुक्यात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक झाली. बैठकी नंतर त्यांनी ही माहिती दिली. अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे ही बैठक झाली. बैठकीस आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, पंचायत समितीच्या सभापती शोभाताई साठे, माजी सभापती वैष्ण्णवीदेवी मोहिते-पाटील, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, पोलीस अधिक्षक मनोज-पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार,आदी उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे यांनी सांगितले, जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत जरी असली तरी जिल्हा प्रशासनाने सर्वांवर उपचारांसाठी यंत्रणा सज्ज केली आहे. यासाठी कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड सेंटर , डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल निश्चित केली आहेत. त्याच बरोबर ग्रामीण भागात रॅपिड ॲटिजेन टेस्टला सुरुवात केली आहे. या टेस्ट पंढरपूर, अकलूज, बार्शी, अक्कलकोट येथे चाचण्या घेतल्या जातील. या चाचण्यांमुळे कोरोनाबाधित व्यक्तींचे तपासणी अहवाल अर्ध्या तासात प्राप्त होणार आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तींवर उपचार जलद गतीने करणे आणि त्यांचे अलगीकरण करणे शक्य होणार आहे.
बैठकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते यांनी तालुक्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी भरतीची जाहिरात दिली असल्याचे सांगितले. नॉन कोविड रुग्णांवर उपचारास नकार देणाऱ्या खासगी दवाखान्यांवर कारवाई अशी मागणी माजी उपसभापती उत्तम जानकर यांनी केली. यावर आवश्यकती कारवाई केली जाईल असे शमा पवार यांनी सांगितले.
पालकमंत्री भरणे यांच्याकडून अधिकाऱ्यांचे कौतुक
माळशिरस तालुक्यात विविध उपाययोजनाकरुन प्रतिबंध केल्या बद्दल पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रांताधिकारी शमा पवार, तहसिलदार अभिजीत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु,गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी रामचंद्र मोहिते यांनी समन्वयाने कोरोना प्रतिबंधासाठी चांगले काम केले. लवकरात –तवकर माळशिरस तालुका कोरोनामुक्त होईल यासाठी प्रयत्न करा आणि राज्यासमोर तालुक्याचा एक आदर्श घालून द्या असे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले. महाळुंग येथील कोविड केअर सेंटरला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल पालकमंत्री भरणे यांनी संर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
ॲन्टजेन टेस्टला सुरूवात
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालय अकलूज येथे ॲन्टीजेन टेस्टला सुरुवात करण्यात आली. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, , पोलीस अधिक्षक मनोज-पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, तालुका आरोग्य अधिकारी रामचंद्र मोहिते, डॉ.सुप्रिया खडतरे उपस्थित होते.