सांगा कल्याणराव कोणाचे.. भाजपा की राष्ट्रवादीचे?.. मतदारसंघात चर्चा, निवडणूक रंगात मात्र नेत्यांची भूमिका गुलदस्त्यातच
पंढरपूर- विधानसभा पोटनिवडणूक रंगात आली असून अत्यंत चुरशीचा सामना येथे होताना दिसत आहे. यात पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील साच मातब्बर गट उतरले असले तरी काळे गटात मात्र शांतता दिसत आहे. सध्या कल्याणराव काळे हे भाजपात दिसत नसले तरी अधिकृतपणे राष्ट्रवादीतही गेलेले नाहीत. या मोठ्या राजकीय गटाची भूमिका गुलदस्त्यात आल्याने कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत आहेत.
काळे हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपात गेले ख पण तेथे ते खूप रमलेले नाहीत. सध्याही ते त्याच पक्षात आहेत कारण त्यांनी पक्षत्याग केलेला नाही मात्र भाजपाच्या व्यासपीठावर ते आलेले नाहीत. पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक सुरू असून राष्ट्रवादी, भाजपा, काँग्रेस, शिवसेनेचे सा पदाधिकारी व नेते येथे दिसत असले तरी काळे मात्र शांत आहेत.
आमदार कै. भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व कल्याणराव काळे यांच्यात संवाद वाढला होता. विठ्ठल परिवारातील नेते म्हणून काळे यांच्याकडे पाहिले जाते. कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी काळे यांनी आपली भूमिका पार पाडली आहे. यानंतर मात्र ते फारसे दिसले नाहीत. त्यांचे नाव भगीरथ भालके यांच्या जनसंवाद यात्रेच्या पत्रिकेवर होते व यावरून तत्कालीन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष ॲड. दीपक पवार यांनी आक्षेप घेतला होता. काळे हे अद्यापही भाजपात असल्याने महाविकास आघाडीच्या पत्रिकेत त्यांचे नाव औचित्याला धरून नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. दरम्यानच्या काळात ॲड. पवार यांना तालुकाध्यक्षपदावरून दूर करण्यात आहे. यानंतर राष्ट्रवादीतही खूप मानापमान नाट्य रंगले होते.
काळे व भालके यांना एकत्रित आणून दोन्ही प्रबळ गटाची ताकद विधानसभेला वापरण्याची तयारी राष्ट्रवादीची असल्याचे दिसत होते. मात्र आता निवडणूक रंगात आली तरी कल्याणराव काळे अद्याप कुठेच दिसत नाहीत. येथे भाजपाचे बडे पदाधिकारी येवून गेले तरी काळे हे तेथेही उपस्थित नव्हते तर भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहीर चार दिवस झाले व आता प्रचार सुरू झाला तरी ते त्यांच्यासमवेत ही दिसत नाहीत. दरम्यानच्या काळात विठ्ठल परिवार व राष्ट्रवादीतील स्थानिक पातळीवरील कुरबूर देखील जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने मिटली आहे.
कल्याणराव काळे यांच्याकडे दोन साखर कारखाने, बँक, दूध संस्था यासह शैक्षणिक संकुल व अन्य संस्था आहेत. हा गट पंढरपूर तालुक्यात प्रबळ मानला जातो. काळे हे माढा विधानसभा लढण्यास उत्सुक असतात व त्यांची तेथे ताकद देखील आहे. मात्र ते 2019 ला लढलेच नाहीत. त्यांच्या कारखान्याला महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत केली आहे. यासाठी त्या काळात कै. भारत भालके यांनी काळेंच्या कारखान्यांसाठी शासनदरबारी प्रयत्न केले होते.