साखर उद्योगाला मदत करा, शरद पवार यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी
पंढरपूर- देशातील साखर उद्योग हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून जात असून यास केंद्र सरकारने मदतीचा हात द्यावा. साखरेची आधारभूत किंमत तीनशे रूपयांनी वाढवून ती प्रतिक्विंटल 3750 रूपये करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
याबाबत पंतप्रधान मोदी यांना पवार यांनी पत्र लिहून साखर उद्योगापुढील संकटाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात साखर कारखानदारी जोमाने वाढली असून देशाच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास 35 टक्के साखर एकट्या महाराष्ट्रात तयार होते. येथील कारखानदारीला नेहमीच पवार यांची साथ लाभली आहे. कारखाने टिकले तरच ऊस उत्पादक शेतकर्यांना चांगला दर मिळू शकतो. देशभरात जवळपास 5 कोटी शेतकरी व कामगार या उद्योगावर अवलंबून आहेत.
मागील काही वर्षांपासून साखर कारखानदारी अडचणीतून जात असून जगभरात साखरेचे उत्पादन जास्त असल्याने घसणारे दर हे याचे प्रमुख कारण आहे. यातच आता कोरोना विषाणूचे संकट आल्याने निर्यातीवर याचा परिणाम झाला आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून साखरेची आधारभूत किंमत 3450 वरून 3750 रूपये प्रति क्विंटल करावी तसेच साखर कारखान्यांच्या अल्पमुदतीच्या कर्जाचे दीर्घ मुदतीच्या (दहा वर्ष मुदत) कर्जात पुनर्गठण करण्याची मागणी केली आहे. याच बरोबर 2018-19 व 2019-20 मधील निर्यात अनुदान तसेच बफर स्टॉक खर्चाचे पैसे तातडीने साखर कारखान्यांना मिळावेत, मागील दोन वर्षात गाळलेल्या उसाला प्रतिटन 650 रूपये अनुदान द्यावे, याचबरोबर साखर कारखान्यांच्या डिस्टिलरी प्रकल्पांना स्टाटेजिक बिझनेस युनिटचा दर्जा देवून यातील इथेनॉल निर्मिती प्रकल्पांना बँकांनी केंद्र सरकारने 2018 मध्ये जाहीर केलेल्या इंटरेस्ट सबव्हेनशन कॅपेक्स स्किम अंतर्गत अर्थपुरवठा करावा. यावर या पत्रात उहापोह करण्यात आला आहे.
साखर कारखाने अडचणीत आल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला धक्का बसत आहे. याचा विचार करून केंद्र सरकार या उद्योगासाठी काही मदत करेल अशी आशा शेतकर्यांना ही वाटते.