सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा

मुंबई, दि.३०: कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडासह शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधासाठी घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे अनेक संसर्गजन्य व प्राणघातक आजारांचा फैलाव होतो. आता तर कोरोनासारख्या महामारीचा संसर्ग हा थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे निष्पन्न झाल्याने याबाबत दक्षता घेऊन जनतेच्या हितासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाची अमंलबजावणी करण्यासाठी साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायद्यामधील तरतुदींनुसार राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासन निर्णयातील आदेश राज्यात सर्वत्र लागू राहतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, धुम्रपान करणाऱ्यास मुंबई पोलिस अधिनियम नुसार पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार रुपये दंड व एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागेल. त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या गुन्ह्यासाठी ३ हजार रुपये दंड व तीन दिवस सार्वजनिक सेवा आणि तिसऱ्या व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये दंड व ५ दिवस सार्वजनिक सेवा अशा शिक्षेची तरतूद आहे.
भारती दंड संहितनेनुसार विविध कलमांनुसार सहा महिने, २ वर्ष शिक्षा व दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये किंवा धुम्रपान करू नये असे आवाहन देखील आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!