सुधाकरपंत..दिवाकर रावते..भेट कडक…आणि भाकरी ही
पंढरपूर हे संतांचे, वारकर्यांचे व देशभरातील कोट्यवधी भक्तांचे श्रध्दास्थान. येथे सतत काहींना काही उपक्रम सुरू असतात. राज्य व केंद्र सरकारचे सतत या क्षेत्राकडे लक्ष असते. शिवसेना व भारतीय जनता पक्षाने तर पंढरपूर, वारकरी संप्रदायाला आपलेसे करण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही. शिवसेनेचे दिग्गज नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही पंढरपूर व भाविकांसाठी योजना आखल्या आहेत व ३३ कोटी रूपयांच्या एसटी महामंडळाच्या यात्री निवास व बसस्थानकाच्या उद्घाटनाचे नियोजन केले. रविवारी ३ मार्च रोजी कार्यक्रम झाला. यासाठी रावते शनिवारीच पंढरीत दाखल झाले. चंद्रभागा मैदानाची पाहणी केली व नेटका कार्यक्रम करण्याची तयारी केली. यासाठी राज्यातील विविध भागातून भाविक येथे आणण्यात आले होते.
रविवारी ३ मार्चला सकाळी कार्यक्रमापूर्वी पंढरपूर विश्रामगृहावर दिवाकर रावते यांच्या भेटीला येथील माजी आमदार सुधाकरपंत परिचारक पोहोचले. वास्तविक पाहता पंत परिचारक हे सर्वच पक्षातील नेत्यांचे येथे स्वागत करताना आजवर दिसून आले आहेत पण आजची रावते भेट जरा कडकच ठरली. याला कारण ही तसेच आहे. विधीमंडळाचे अधिवेशन नुकतेच संपले असून शेवटच्या दिवशी भाजपा सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा प्रश्न उपस्थित झाला होता. प्रशांत परिचारक यांनी दोन वर्षापूर्वी सैनिकांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांना विधानपरिषदेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांचे निलंबन मागील वर्षीच मागे घेण्यात आले असले तरी त्यांना सभागृहात येण्यास मज्जाव करण्यात आला आहेे. शिवसेनेचा परिचारक यांना विरोध आहे. दरम्यान अधिवेशन संपताना हा विषय सभागृहात खूप गाजला होता. शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते हे परिचारकांविरोधात आघाडीवर होते.
दरम्यान शनिवार व रविवारी रावते पंढरपूर दौर्यावर होते. रविवारी सकाळी आमदार प्रशांत परिचारक यांचे काका व राज्याच्या राजकारणातील मातब्बर सुधाकरपंत परिचारक यांनी त्यांची विश्रामगृहात जावून भेट घेतली. याच वेळी नेमकी माध्यम तेथे पोहोचली आणि पुढे बरेच महाभारत घडले. पंतांना ही यावेळी येथे पत्रकार पोहोचतील अशी कल्पना नव्हती. ते विश्रामगृहातून बाहेर पडल्यावर पत्रकारांनी रावते यांना परिचारकांच्या भेटीचा तपशील विचारला. सुरूवातीला सारे शांततेत बोलणे सुरू असताना विधानपरिषदेतील परिचारक यांच्याविषयीचा प्रश्न पुढे आला आणि एका अभ्यासू पत्रकाराने आपण विधानपरिषदेत विरोध परिचारकांना विरोध करता आणि येथे मात्र त्यांच्या काकांशी चर्चा होते..असे म्हणताच रावते चिडले. त्यांनी कॅमेरे बंद करायला लावले. हळूहळू त्यांचा रागाचा पारा कमी झाला तोवर सारे वातावरण अत्यंत तणावाचे होते. सुरूवातीला वैतागलेल्या रावते यांनी नंतर पत्रकारांना समजावून सांगत आपण सुधाकरपंत परिचारकांना येथे निलंबन या विषयी आपल्याशी बोलायचे नाही असे सांगितल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले , भारतीय सैनिकांबाबत कोणीही आक्षेपार्ह विधान केले तर आम्ही ते खपवून घेणार नाही. जरी या ठिकाणी शिवसेनेचाच अथवा आणखी कोणी जरी आमदार जरी असता तरी आमची हीच भूमिका असती.
शिवसेनेने पहिल्यापासून प्रशांत परिचारक यांना त्यांच्या वक्तव्याबाबत धारेवर धरले आहे व आज ही त्यांची भूमिका कायम असल्याचे दिवाकर रावते यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे. मुळात रावते हे स्पष्टवक्ते म्हणूनच प्रसिध्द आहेत. त्यांनी आज पंढरीत याच पध्दतीने उत्तर दिल्याचे दिसून आले. सुधाकरपंत परिचारक हे पंढरीत आलेल्या अन्य पक्षातील नेत्यांचे , मंत्र्यांचे नेहमीच स्वागत करतात हे पाहावयास मिळते. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची पंढरीत डिसेंबर २०१८ मध्ये सभा झाली त्यावेळी याच्या नियोजनासाठी येथे पर्यावरणमंत्री रामदास कदम व अन्य खासदार आले असता सुधाकरपंतांनी त्यांचे स्वागत केले होते. त्यावेळी सारे खेळीमेळीत होते. परंतु यंदा रावते व सुधाकरपंत परिचारक यांची भेट गाजण्याचे कारण नुकताच आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा विषय विधानपरिषदेत गाजला होता व परिचारक यांच्या विरोधात रावते आघाडीवर होते.
दरम्यान विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत दिवाकर रावते हे परिवहन महामंडळाच्या कार्यक्रमासाठी गेले व तेथे ही पंत परिचारक उपस्थित होते. दुपारी एकच्या दरम्यान सुधाकरपंतांनी कार्यक्रमस्थळ सोडले. येथे मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारती ही उपस्थित होते. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे व परिवहन राज्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणारे विजयकुमार देशमुख हे आपल्याच विभागाच्या कार्यक्रमात दिसले नाहीत. या कार्यक्रमावर शिवसेनेची छाप दिसून येत होती. दरम्यान सकाळी विश्रामगृहातील परिचारक व रावते यांची भेट पत्रकारांनी अगदीच कडक…केली होती..आणि तोच कडकपणा कार्यक्रमस्थळी ही दिसून आला पण तो भाकरीच्या स्वरूपात. याने ही येथील वातावरण भर उन्हात कडक.. केले.
राज्याच्या विविध भागातून महाराज मंडळींनी भाविकांना पंढरीत एसटी बसेसच्या माध्यमातून आणले होते. जवळपास तीन हजाराच्या आसपास लोक असावेत असा अंदाज आहे. चंद्रभागा बसस्थानकात सार्या बसेस उभ्या होत्या. यात विठाई बसेसची संख्या जास्त होती. हे भाविक सकाळपासून कार्यक्रम स्थळी होते. दुपारी तहान व भूक लागल्याचे जाणवत होते. पण जागेवरच पाण्याच्या बाटल्या दिल्या जात होत्या. शेवटी काही भाविकांनी जेवणाचा शोध घेतला व बाहेरच आयोजकांनी भोजनाची व्यवस्था केली होती. तेथे सोलापुरी कडक भाकरी व चटणीचा बेत होता. पण या भाकरी वृध्दांना खाता येत नाही. यात चटणी कोरडी असल्याने पंचाईत झाली आणि नेमके नाराज भाविक पत्रकारांसमोर आले व त्यांनी आपली कैफियत मांडली. पाहता पाहता गर्दी वाढली. एका बाजूला कार्यक्रम दुसर्या बाजूला कडक भाकरीने नाराज भाविकांच्या माध्यमांसमोर तक्रारी असे दृष्य होते. अनेक अधिकारी व कर्मचार्यांनी तक्रार करणार्या भाविकांना समावून सांगितले पण काही जण आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. माध्यमांनी क परिवहन मंत्र्यांना गाठले पण त्यांनी शांत राहणे पसंत केले व वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक विठ्ठल पाटील यांना माध्यमांसमोर उभे केले. सकाळी विश्रामगृहात रावते – परिचारक भेटीमुळे सुरू झालेला कडकपणाचा सोहळा…कार्यक्रमस्थळी ही कडक भाकरीमुळे तसाच राहिल्याचे चित्र होते.
दरम्यान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विठ्ठल भक्तांच्या सोयीसाठी पंढरीत ३३ कोटी रूपयांचे भक्तनिवास व नवीन बसस्थानक उभा करण्यास सुरूवात केली आहे. भाविकांना विठाई बसच्या माध्यमातून आपल्या गावातून पंढरीत आणणे व येथे दर्शन व निवासाची सोय व परत गावी त्याच बस मधून पाठविण्याचा उपक्रम हाती घेतला आह. एक हजार विठाई बस राज्यभरातून धावणार आहेत. त्यांचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असा आहे. हे यात्री निवास आषाढी व कार्तिकी यात्रेत परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांसाठी वापरले जाईल व अन्य वेळी भाविक यांचा वापर करतील. येथे निवास व माफक दरात भोजनाची सोय केली जाणार आहे.रविवारी याचे भूमिपूजन वारकरी संतांच्या वशंजांच्या हस्ते करून रावते यांनी एक चांगला आदर्श ही राज्यासमोर ठेवला आहे. येथे भजन ,कीर्तन व हरिनामाच्या गजरात कार्यक्रम झाला.
|
|