पंढरपूर – सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढताना दिसत असून मंगळवारी २ मार्च रोजी आलेल्या अहवालानुसार ६६ रूग्ण आढळून आले आहेत. आजवर ग्रामीणमध्ये ४० हजार ६३७ रूग्ण सापडले असून ११८४ जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या ४९७ जण उपचार घेत असून ३८ हजार ९५६ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
मंगळवारी आलेल्या अहवालानुसार ६६ रूग्ण एकाच दिवशी आढळून आले असून सर्वाधिक माढा तालुक्यात १९ आहेत. यापाठोपाठ बार्शी १२, माळशिरस ९ तर पंढरपूर तालुक्यात ७ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने प्रशासनाने काही निर्बंध ही लागू केले असून रात्र संचारबंदी लागू आहे.
दरम्यान पंढरपूर शहरात ५ तर तालुक्यात २ रूग्णांची भर मंगळवारी पडली असून येथील एकूण संख्या ८२१९ इतकी झाली आहे. सध्या ५३ जणांवर केवळ उपचार सुरू आहेत. ७९२४ जण उपचार घेवून परत घरी गेले आहेत तर २४३ जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आजवर सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक रूग्ण हे पंढरपूर तालुक्यातच आढळून आले आहेत.