सोलापूर जिल्हयात ग्रामीणमध्ये ९ तालुक्यात 73 रूग्णांची नोंद, ६ जण उपचारानंतर घरी परतले

पंढरपूर– सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांपैकी करमाळा व मंगळवेढ्यात एक ही कोरोनाचा रूग्ण आढळून आलेला नाही. ग्रामीणमध्ये (सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) उर्वरित नऊ तालुक्यांमध्ये ( ज्यात ग्रामीण भाग व नगरपरिषद क्षेत्राचा समावेश आहे)एकूण 73 रूग्ण आढळून आले आहेत. यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला असून 61 जणांवर उपचार सुरू आहेत तर उर्वरित सहा जण उपचारानंतर घरी परतले आहेत.
शनिवारी 6 जून रोजी सायंकाळपर्यंत तीन रूग्णांची वाढ झाली. यापैकी दोन दक्षिण सोलापूरचे तर एक जण उत्तर सोलापूर तालुक्यातील आहे. दरम्यान शनिवारी एक रूग्ण बरा होवून घरी परतला.आजवर जे 73 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत यात 46 पुरूष तर 26 स्त्री रूग्णांचा समावेश आहे. (यातील एक व्यक्ती ही पुणे येथे पॉझिटिव्ह आली आहे.)
ग्रामीण भागात कोविड 19 सर्वाधिक रूग्ण हे दक्षिण सोलापूर तालुक्यात आढळून आले असून त्यांची संख्या ही 28 इतकी आहे. आजवर अन्य तालुक्यात कोरोनाचे सापडलेले रूग्ण पुढील प्रमाणेः अक्कलकोट 8, बार्शी 18, माढा 1, माळशिरस 2, मोहोळ 4,उत्तर सोलापूर 2, पंढरपूर 7, सांगोला 3. असे एकूण 73 रूग्ण आढळून आले आहेत.
शनिवारी 6 जून रोजी 28 अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 25 निगेटिव्ह आहेत तर 3 पॉझिटिव्ह आले आहेत. हे तीन ही पुरूष रूग्ण आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजवर 1510 चाचण्या करण्यात आल्या असून यापैकी 1478 अहवाल प्राप्त झाले आहेत. अद्याप 32 अहवाल प्रलंबित असून एकूण पॉझिटिव्ह अहवाल हे 72 आहेत तर 1406 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!