सोलापूर जिल्हा : पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार; जिल्हा परिषदेकडून जय्यत तयारी सुरू
सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार 27 जानेवारी 2021 पासून जिल्ह्यातील 5 वी ते 8 वीच्या शाळा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
जिल्हा परिषदमध्ये शाळा सुरू करण्याबाबत तयारीच्या आढावा बैठकीत श्री. स्वामी बोलत होते. यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांच्यासह तालुकास्तरीय शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.
श्री. स्वामी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील प्राथमिक विभागाच्या शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शाळांची स्वच्छता आणि सॅनिटायझेशनचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे. या कामासाठी ग्रामपंचायत, शालेय पोषण आहार विभागाची मदत घ्या. माध्यमिकच्या शाळांची स्वच्छता करून घ्या. वर्षभर खोल्या बंद असल्याने दुर्गंधी येऊ नये, संपूर्ण स्वच्छता व्हावी, यासाठी खोल्या उघड्या ठेवा. कोरोनाविषयक सर्व खबरदारी घेऊनच शाळा सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांसाठी मास्कची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करा, असे त्यांनी सांगितले.
पालक-शिक्षकांनी मुलांची काळजी घ्यावी
शिक्षकांनी पालक आणि विद्यार्थी यांची मते जाणून घ्यावीत. पालक सभा घेऊन त्यांना विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचे पटवून द्या. पालक गट, ग्राम शिक्षण समिती, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागरण करण्यात येणार. शिक्षकासह पालकांनीही मुलांची काळजी घ्यावी. कमी दप्तर, डबा, सॅनिटायझर, मास्क वापरणे, हात धुणे या बाबी मुलांना समजावून द्याव्यात. मुलांना खेळताना, शाळेत बसताना शारिरीक अंतराचे महत्व पटवून द्यावे.
जिल्ह्यात 5 वी ते 8 वीच्या जिल्हा परिषद, खाजगी, महापालिका, नगरपालिका, समाजकल्याण, आदिवासी कल्याण, केंद्रीय, नवोदय विद्यालय, मदरसा, अनुदानित आणि विना अनुदानित अशा एकूण 2153 शाळा असून यामध्ये 8236 शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांना शाळेच्या किंवा त्यांच्या गावाच्या जवळ आरटीपीसीआर चाचणी करण्याची सोय करण्यात येणार आहे. या शिक्षकांच्या चार दिवसात आरटीपीसीआर चाचण्या केल्या जाणार आहेत. शिवाय शिक्षकेतर कर्मचारी यांच्याही तपासण्या करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. केंद्रस्तरावर बैठक घेऊन शाळा सुरू करण्याची काटेकोर नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
25 जानेवारीला कर्मचाऱ्यांची प्रभातफेरी
शाळा सुरू करण्याबाबत गावात जनजागृती करणे महत्वाचे आहे. यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी, शिक्षक यांनी प्रभातफेरीत सहभागी व्हावे. फेरीमध्ये मास्कचा वापर, शारिरीक अंतर याचे पालन करावे. शिक्षकांनी कोरोनाविषयक पोस्टर, बॅनर तयार करून जनजागरण करावे, असेही श्री. स्वामी यांनी सांगितले.
तीन लाख 4527 विद्यार्थी
जिल्ह्यात शासकीय आणि खाजगी 5 वी ते 8 वीचे तीन लाख 4527 विद्यार्थी आहेत. यामध्ये 1 लाख 61 हजार 291 मुले तर 1 लाख 43 हजार 236 मुलींचा समावेश आहे.
यु-ट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण
कोविड काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेने यु-ट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाची सोय केली. जिल्हास्तरावर शैक्षणिक व्हिडीओ तयार करण्यासाठी स्टुडिओची निर्मिती केली आहे. मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमासाठी 836 व्हिडीओची निर्मिती करण्यात आली असून स्टडी वेल ॲपचीही निर्मिती केली आहे. 20 हजार 516 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामध्ये 20 हजार 78 डाऊनलोड झाले आहेत.