सोलापूर विद्यापीठाच्या ललितकला महोत्सवात विद्यार्थ्यांचा ऑनलाइन कलाविष्कार
सोलापूर– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात आयोजित ललितकला महोत्सवास विद्यार्थी कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 44 विद्यार्थी कलाकारांनी यामध्ये सुंदर कलाविष्काराचा नजराणा दाखविला.
विद्यापीठ बंद असल्याने घरी राहून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ललित कला व कला संकुलाच्यावतीने ऑनलाइन ललित कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतून या कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ललित कला संकुलाच्या संचालिका डॉ. माया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ऑनलाईन स्पर्धेत गायन, वादन, नृत्य, नाट्य आणि चित्रकला इत्यादी कलाप्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. गायन स्पर्धेत शास्त्रीय गायन, लोकगीत, नाट्यगीत, चित्रपट गीत, वाद्य स्पर्धेत तबला, हार्मोनियम, बासरी, सितार तर नाट्य स्पर्धेत मूकनाट्य, एकपात्री प्रयोग आदी कलाप्रकारांचा समावेश होता. चित्रकला स्पर्धेत ‘काळजी घेऊया, कोरोनाला पळवून लावू या’ या संकल्पनेवर आधारित सुंदर व आशययुक्त संदेश देणारी चित्रे स्पर्धकाने काढली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, डॉ. आनंद धर्माधिकारी, प्रा. दीपक दाभाडे, प्रा. प्रियांका सीतासावद आदींनी काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल:-
गायन स्पर्धा: प्रथम क्रमांक सानिका कुलकर्णी, द्वितीय क्रमांक- चिन्मयी सोपल, तृतीय क्रमांक रसिका कुलकर्णी तर उत्तेजनार्थ पारितोषिक मयुरी वाघमारे हिने पटकाविले.
वाद्यवादन स्पर्धा: प्रथम सन्मित्र रणदिवे, द्वितीय क्रमांक चिन्मयी सोपल, तृतीय क्रमांक अनिकेत पुजारी तर उत्तेजनार्थ बक्षीस जयेश कुलकर्णी यांनी पटकाविले.
नाट्यस्पर्धा: प्रथम क्रमांक आकाश बनसोडे तर द्वितीय क्रमांक किरण जगदाळे यांनी पटकाविले.
चित्रकला स्पर्धा: प्रथम क्रमांक शरणबसवेश्वर गुरव, द्वितीय क्रमांक कीर्ती नगरकर, तृतीय क्रमांक गणेश अंतड तर उत्तेजनार्थ बक्षीस शुभम रणखांबे यांनी मिळवले.