सोलापूर विद्यापीठात कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीचा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम

बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करियरची सुवर्णसंधी

सोलापूर– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात गत दोन वर्षापासून तंत्रज्ञान संकुलाच्या अंतर्गत ‘इंटिग्रेटेड एमटेक इन कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी’ या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यासाठी प्रवेश दिला जातो. पाच वर्षाच्या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना बीटेक आणि एमटेक असे पदवी आणि पदव्युत्तरचे दोन पदव्या प्राप्त होतात.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतून या नव्या अभ्यासक्रमाची सुरुवात झाली आहे. ‘इंटिग्रेटेड एमटेक इन कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी’ हा अभ्यासक्रम एकूण पाच वर्षांचा असून त्यामध्ये तीन वर्षानंतर बीटेक पदवीचे व पाच वर्षानंतर एमटेक पदवीचे शिक्षण पूर्ण करता येते. हा अभ्यासक्रम पूर्णपणे नाविन्यपूर्ण असून यासाठी विद्यापीठात सुसज्ज लॅब व स्मार्ट रुम्स तसेच तज्ञ प्राध्यापक उपलब्ध आहेत.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावी विज्ञान शाखा व जीवशास्त्र विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमात सौंदर्यप्रसाधने तयार करणे व त्याची गुणवत्ता तपासणे, सौंदर्यप्रसाधनांची गुणवत्ता वाढवणे इत्यादीचे शिक्षण या अभ्यासक्रमात शिकवले जाते व त्यासंदर्भात प्रॅक्टिकल ज्ञान देण्यात येते. सौंदर्यप्रसाधने संदर्भात विविध उद्योग आणि कंपन्यांमध्ये मोठ्या रोजगाराच्या संधी या अभ्यासक्रमानंतर प्राप्त होतात. संशोधनाची संधी देखील या माध्यमातून प्राप्त होते. या अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी सुजय घोरपडे (7620093597) आणि गणेश जगताप (9096549917) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन या संकुलाच्या संचालिका डॉ. अंजना लावंड यांनी केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास विभागांतर्गत विविध कौशल्य कोर्सेस सुरू आहेत. त्यासंदर्भाची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. विद्यार्थी, पालकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!