‘स्वयं-मूक’च्या ऑनलाईन कोर्सेससाठी लोकल चॅप्टरची सोलापूर विद्यापीठास मान्यता
सोलापूर, दि. 24- भारत सरकारच्या मानव संसाधन व विकास मंत्रालयामार्फत चालवण्यात येणाऱ्या ‘स्वयं-मूक’च्या ऑनलाईन कोर्सेससाठी लोकल चॅप्टरची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला मान्यता मिळाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. यामुळे आता विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांसाठी स्वयं-मूक’चे ऑनलाइन कोर्सेस सुरु करता येणार आहेत.
देशभरातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे ऑनलाईन शिक्षण मिळावे, या हेतूने स्वयं-मूक’च्या कोर्सेसची रचना करण्यात आली आहे. नवी दिल्लीच्या विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सर्व विद्यापीठांना सदरील कोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. स्वयं-मूक’च्या कोर्सेसची उपयुक्तता लक्षात घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची छाननी झाल्यानंतर स्वयं-मूक’कडून लोकल चॅप्टरची मान्यता देण्यात आली आहे.
स्वयं-मूक’च्या लोकल चॅप्टरची मान्यता मिळाल्यानंतर विद्यापीठाकडून एका ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून विद्यापीठातील शिक्षकांना सदर कोर्सेसची माहिती देण्यात आली आहे. याचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, यासाठी विभागनिहाय एकूण 22 मार्गदर्शकांची नियुक्ती विद्यापीठाकडून करण्यात आली आहे. या मार्गदर्शकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. रमेश गाढवे यांनी केले. डॉ. अमोल गजधाने यांनी ऑनलाइन नोंदणीबाबत माहिती दिली.
*’स्वयं-मूक’च्या कोर्सची गरज*
सध्याच्या काळात ऑनलाइन शिक्षणाची अतिशय गरज असून ‘स्वयं-मूक’च्या कोर्समुळे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी फायदा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी करून ‘स्वयं-मूक’च्या कोर्सेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले आहे.