स्वाभिमानी संपूर्ण ताकदीनिशी पंढरपूर पोटनिवडणुकीत उतरली, राजू शेट्टींची विरोधी दोन्ही साखर कारखानदार उमेदवारांवर जोरदार टीका

पंढरपूर – महाविकास आघाडीतील घटकपक्ष असल्याने पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत हा पक्ष उतरणार नाही असा कयास होता मात्र तो फोल ठरला असून स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी आता शेतकरी संघटनेने येथे जोरदार व्यूररचना केली आहे. रविवारी पक्षाचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पंढरपूरचा दौरा केला या निवडणुकीतील राष्ट्रवादी व भाजपाच्या उमेदवारांवर टीका करताना या साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांची कोट्यवधीची एफआरपी थकविल्याचा मुद्दा ऐरणीवर आणला.

भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे व राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्यावर टीका करताना राजू शेट्टी म्हणाले, संत दामाजी व श्री विठ्ठल हे दोन्ही शेतकर्‍यांचे दैवत आहेत. दुष्काळात मंगळवेढ्याच्या संत दामाजीपंतांनी धान्याची कोठारं जनतेसाठी खुली केली होती. मात्र सध्या येथे त्यांच्या नावाने असणार्‍या दामाजी कारखान्याने मात्र शेतकर्‍यांच्या घामाचे पैसेच थकविले आहेत. ते शेतकर्‍यांना कोट्यवधी रूपयांची थकबाकी देणे आहेत. तर दुसरीकडे श्री विठ्ठल हा गोरगरीब, कष्टकर्‍यांचा देव मात्र त्याच्या नावाने असलेल्या पंढरपूर तालुक्यातील साखर कारखान्याची स्थिती काय आहे.. त्यांनीही ऊस उत्पादकांचे पैसे थकविले आहेत. आम्ही शेतकर्‍यांशी बांधिल असून त्यांच्या न्यायहक्कासाठी सतत रस्त्यावर उतरतो.संघटनेचे नेते रविकांत तुपकर म्हणाले, सचिन पाटील यांच्या उमदेवारीला शेतकर्‍यांसह सर्वांचा पाठिंबा आहे. सर्वसामान्यांसाठी लढणारा हा युवक आहे. सर्वांनी त्यांना साथ देणे गरजेचे आहे. यावेळी तुपकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना, शेतकर्‍यांची वीज कनेक्शन तोडली जात असताना कोणत्या बिळात लपला होता? असा सवाल केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटना व पंढरपूरचे नाते जुने असून शेतकरी आंदोलनाची नेहमीच सुरूवात येथून झाली आहे. 2009 ला कै.भारत भालके यांना रिडालोसमधून याच स्वाभिमानी पक्षाने उमेदवारी दिली व ते विजयी झाले होते. आता स्वाभिमानी पक्ष हा महाविकास आघाडीत असला तरी त्यांनी वीजबिलाच्या प्रश्‍नासह अनेक विषयांवर त्यांचे सरकारशी मतभेद आहेत. यातच स्वाभिमानी पक्ष व त्यांची शेतकरी संघटना ही लढवय्यी म्हणून ओळखली जाते. त्यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला व आपली पूर्ण ताकद येथे लावली आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!