पंढरपूर – पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या असून दोन दिवसांपूर्वी आमदार प्रशांत परिचारक यांनी माचणूरमध्ये भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यावर टीका करताना कारखाना बंद पाडणार्यांच्या विचारांचे आपण वारसदार आहात काय? असा सवाल विचारत आमदार कै.भारत भालके यांच्या कारकिर्दीवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले होते. हाच मुद्दा घेत रविवारी रांझणी येथे भगीरथ भालके यांनी परिचारकांना, आपल्यात राजकीय मतभेद जरूर असू द्यात पण मनभेद ठेवू नका. जे हयात नाहीत त्यांच्याबाबत बोलताना विचार करून यात, असे आवाहन केले.
रविवारी भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ रांझणी येथील शंभू महादेवाच्या मंदिरात दर्शनाने करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, दीपक साळुंखे, सुरेश घुले, विजयसिंह देशमुख यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी बोलताना भगीरथ भालके म्हणाले, कोरोनाने देशाचे व राज्याचे मोठे नुकसान केले आहे. या आजाराने पंढरपूर तालुक्याची सर्वाधिक हानी केली. स्व.सुधाकरपंत परिचारक, आमदार भारत भालके, राजूबापू पाटील, रामदास महाराज जाधव, चरणूकाका पाटील, वा.ना. उत्पात महाराज यांना आपण गमावले आहे. याचे दुःख अजूनही जनतेच्या मनात आहे.
ही निवडणूक भावनिक मुद्यावर होत असल्याचा आरोप विरोधक करतात. ग्लिसरिन लावून अश्रू डोळ्यात आणले जाते, अशा खालच्या पातळीची भाषा वापरत आहेत. परंतु आजही जेंव्हा आम्ही जनतेत जातो तेंव्हा लोक आपण गमावलेल्या नेत्याच्या आठवणी काढून भावनिक होतात. त्यांच्या डोळ्यातून पाणी येते. यामुळे परिचारक साहेब आपण ठेकेदाराच्या नादी लागून आपली प्रतिष्ठा कमी करू नका असे भगीरथ भालके यांनी यावेळी सांगितलेे. ते पुढे म्हणाले, पंढरपूर तालुका व मतदारसंघाची संस्कृती, परंपरा मोठी आहे. येथे राजकीय मतभेद जरूर होतात पण मनभेद कधी पाहावयास मिळालेले नाहीत.