हाऊसफुल्ल धरणांमधून विसर्ग होत असलेल्या उजनीत आवक, भीमा खोर्‍यात पावसाची विश्रांती

पंढरपूर– सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण उपयुक्त पातळीत 109 टक्के भरले असून जवळपास 122 टीएमसी पाणीसाठा येथे झाला आहे. हा प्रकल्प तुडूंब भरला आहे. भीमा खोर्‍यातील जवळपास सर्वच धरण भरल्याने तेथून होत असलेल्या विसर्गामुळे उजनीत येणारी आवक कमी जास्त आहे. या धरणात आता पाणी साठविण्याची क्षमता थोडीच शिल्लक राहिल्याने वीज निर्मिती, कालवा, बोगद्यात पाणी सोडले जात आहे. याच बरोबर वरून येणारी आवक पाहता सांडव्यातून ही पाणी सोडले जाईल.
उजनी धरणातील पाण्याची पातळी सकाळी साडेदहा वाजता 497.240 मीटर होती. यात जवळपास 122 टीएमसी एकूण पाणीसाठा झाला आहे. दरम्यान भीमा खोर्‍यातील घोड प्रकल्पातून 3100, आंध्रा 516, पवना 2160, मुळशी 2600 तर खडकवासलामधून 1700 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे सहाजिकच दौंडची आवक ही दहा हजार क्युसेकपेक्षा जास्त राहणार आहे. साडेदहा वाजता पारगावचा विसर्ग हा 11542 क्युसेकचा होता तर दौंडचा विसर्ग 9852 क्युसेक इतका स्थिरावला होता. धरणातून कालव्यात बोगद्यात 900, वीज निर्मिती 1600 , कालवा 2000 तर सीना माढा उपसा योजनेत 262 असे 4700 क्युसेकच्या आसपास पाणी सोडले जात आहे. आवक ही सोडण्यात येणार्‍या पाण्यापेक्षा जास्त असल्याने व धरणात पाणी साठवण क्षमता ही कमी राहिल्याने उजनीतून आता सांडव्यात विसर्ग सोडण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे हा प्रकल्प जेंव्हा 497.330 मीटर अशा पाणी पातळीत येईल तेंव्हा धरणाचे दरवाजे उघडून यातून पाणी सोडले जाईल. सध्या धरणाची पातळी 197.240 मीटर आहे.
दरम्यान भीमा खोर्‍यातील पावसाने बुधवारी पूर्णतः विश्रांती घेतली असून दोन तीन धरणांवर किरकोळ पर्जन्यमान नोंदले गेले आहे. मात्र उजनीला पाणी देवू शकणारी धरणे आता शंभर टक्के भरली आहेत. मुळा मुठा साखळी धरणे हाऊसफुल्ल असल्याने मागील प्रकल्पातून पाणी येताच खडकवासल्यातून विसर्ग वाढविले जातात. याच बरोबर मुळशी , पवना ही धरणे शंभर टक्के भरल्याने तेथून विसर्ग सुरू आहेत. घोड उपखोर्‍यात ही मागील काही दिवस सुरू असलेल्या पावसाने अन्य धरणांचे दरवाजे उघडल्याने घोडमधून ही पाणी सोडले जात आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!