20 टक्के ऑनलाइन शिक्षणाचा वापर करा, नवीन पद्धतीवर भर देऊन गुणवत्ता वाढवा: डॉ. शर्मा
सोलापूर विद्यापीठातर्फे आयोजित नॅशनल वेबिनारमध्ये 625 जणांचा सहभाग
सोलापूर, दि. 10- कोरोनामुळे उच्च शिक्षणात फार मोठा बदल झालेला आहे. आता पारंपारिक शिक्षण पद्धतीला छेद देऊन आधुनिकतेची कास धरणे आवश्यक आहे. ऑनलाइन शिक्षणाचा किमान वापर 20 टक्के करणे गरजेचे आहे. विद्यार्थी-शिक्षक यांच्यातील संवाद, चर्चा व संबंध ठेवूनच शिक्षणामध्ये गुणवत्तेचा विकास करा, असे आवाहन ‘बंगळुरूच्या नॅक’चे संचालक डॉ. एस. सी. शर्मा यांनी केले.
बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘कोरोनानंतर उच्च शिक्षणात होणारा बदल आणि नॅकची भूमिका’ या विषयावर नॅशनल वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारचे उद्घाटन संचालक डॉ. शर्मा यांच्या हस्ते झाले. यामध्ये उपसंचालक अमेयकुमार रथ, सहाय्यक सल्लागार डॉ. लीना गहाणे, डॉ. गणेश हेगडे आदींनी मार्गदर्शन केले. प्रारंभी कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी प्रास्ताविक करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची माहिती विशद केली. यावेळी त्यांनी विद्यापीठातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध कौशल्याभिमुख व नाविन्यपूर्ण उपक्रम व अभ्यासक्रमांची माहिती दिली.
डॉ. शर्मा म्हणाले की, उच्च शिक्षणात ऑनलाइन शिक्षणाबरोबरच विद्यार्थी-प्राध्यापक यांच्यातील प्रत्यक्ष संवाददेखील फार महत्वाचा आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी 20 टक्के ऑनलाइन शिक्षणाचा वापर करण्यात यावा. नव्या शिक्षणपद्धतीवर सर्वांनी भर दिला पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
अमेयकुमार रथ यांनी नवीन शिक्षण पद्धतीचा वापर करण्याचे सांगून क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचे असल्याचे सांगितले. डॉ. गहाणे यांनी नवीन शिक्षण पद्धत ही क्लासरूम व त्याबाहेर पाहिजे, असे सांगून उच्च शिक्षणपद्धतीत पुनर्निर्माणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. हेगडे यांनी विद्यार्थी व संस्थेला पुढे घेऊन जाण्यासाठी गुणवत्ता फार महत्वाचे असल्याचे सांगून त्याकरिता मूल्यांकन होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी प्राध्यापक आणि अभ्यासकांनी विचारलेल्या किमान 100 प्रश्नांची उत्तरे दिली.
या नॅशनल वेबिनारमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व संलग्न महाविद्यालये तसेच मुंबई, गोवा, अमरावती, एसएनडीटी विद्यापीठातील एकूण 625 जणांचा सहभाग होता. या नॅशनल वेबिनारचे यशस्वी आयोजन डॉ. व्ही. बी. पाटील व प्रा. चंद्रकांत गार्डी यांनी केले.