31 मेपर्यंत लॉकडाऊन कायम,मात्र शनिवारपासून किराणा, दूध, भाजीपाला सुरू
सोलापूर, – कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सध्या सुरू असलेला लॉकडाऊन 31 मे पर्यंत कायम राहणार आहे. मात्र उद्यापासून (शनिवार) सकाळी सात ते अकरा या वेळेत शहर व जिल्ह्यातील किराणा दुकाने, दूध, भाजीमंडई तसेच इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. परंतु याठिकाणी गर्दी आढळल्यास व विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
शुक्रवारी, सात रस्ता परिसरातील नियोजन भवनात पालकमंत्री भरणे यांनी कोरोनावरील उपाययोजनेबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे आदेश काढतील. या नव्या आदेशानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी सात ते अकरा या वेळेत सवलत दिली जाईल व उर्वरित वेळेत पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम लागू राहतील, असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाने यापूर्वी लागू केलेला लॉकडाउन १५ मे नंतर 31 मे पर्यंत लागू राहणार आहे. परंतु या दरम्यान अत्यावश्यक सेवांना मुभा राहील. अत्यावश्यक सेवा ठिकाणी लोकांनी अनावश्यक गर्दी करू नये. लोकांनी फिजिकल डिस्टनसिंग पाळावे. गर्दी आढळल्यास तत्काळ कारवाई होईल, तशा सूचना पोलीस विभागाला दिल्या आहेत, असेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. एखाद्या दुकानात गर्दी आढळली तर त्या दुकानदारावर कारवाई होईल मंडईत गर्दी आढळली तर मंडईवर कारवाई होईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कायमचा लॉकडाऊन हा कुणालाही परवडणारा नाही. त्यामुळे सर्वांचेच नुकसान होत आहे. याचा विचार करून 31 मे पर्यंत वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काही बाबींना सवलती देण्यात आल्या आहेत. सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. त्याचप्रमाणे बाजार समितीतील सर्व शेतमालाचे लिलाव व विक्री याच वेळेत सुरळीत पार पडतील. तसेच पावसाळा तोंडावर आल्याने शेतीची सर्व कामे करण्यासाठी मुभा देण्यात आली आली आहे, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले