पंढरपूरमध्ये 102 वर्षाच्या आजीबाई झाल्या कोरोनामुक्त
पंढरपुर- उपजिल्हा रुग्णालयात योग्य औषधोपचारानंतर पंढरपूर तालुक्यातील मौजे गादेगाव येथील १०२ वर्षाच्या आजीबाईंनी कोरोना आजारावर यशस्वीपणे मात केली आहे.
गादेगाव येथे राहणाऱ्या १०२ वर्षाच्या आजींना अस्वस्थ वाटू लागल्याने व श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने १२ ऑक्टोबर २०२० रोजी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे अत्यवस्थ अवस्थेत दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ८४ टक्के होते तसेच त्यांना दम लागत होता व कोरोना संबंधीत इतर सर्व लक्षणेही दिसून येत होती.
उपजिल्हा रुग्णालयाचे फिजिशियन डॉ.सचिन वाळुजकर यांचे मार्गदर्शनाखाली या आजींना ऑक्सिजन देवून, सलाईनव्दारे प्रतिजैविके व इतर औषधे देऊन ,कोविड वॉर्डातील सर्व वैद्यकीय अधिकारी , अधिपरिचारीका ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि वर्ग-४ कर्मचारी यांनी यशस्वीपणे उपचार केले व या आज्जींची चांगल्या प्रकारे काळजी घेतली.
त्यामुळे त्यांची कोरोनाची लक्षणे हळूहळू पूर्णपणे नाहीशी झाल्याने २१ ऑक्टोबर रोजी त्यांची सहा मिनिटे वॉक टेस्ट घेण्यात आली. यावेळी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ९९ टक्के आढळून आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.जयश्री ढवळे व नोडल ऑफिसर डॉ. प्रदीप केचे यांनी
दिली.