विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण
मुंबई – माजी मुख्यमंत्री व भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती त्यांनीच twitter वरुन दिली आहे.
कोरोनाची साथ आल्यापासून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यभर फिरून पाहणी करत होते. राज्यात कोरोना रुग्णांना चांगले उपचार मिळावेत तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी दिवसरात्र दौरे केले आहेत. रुग्णालयांना भेटी दिल्या आहेत. यानंतर आता राज्यात अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाल्यावर त्यांनी जवळपास 900 किलोमीटर प्रवास करून नुकसानीची पाहणी केली.
ते बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे प्रभारी म्हणून काम पाहात आहेत. बिहारमध्ये त्यांचे सतत दौरे सुरु होते.
देवेंद्र फडणवीस यांनी tweet करून कळविले आहे की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी !