शेतकऱ्यांना दिलासा : धाराशिव कारखान्याने दिवाळीसाठी दिले प्रतिटन 200 रू. ऊसबिल
पंढरपूर – पंढरपूरमधील डिव्हीपी उद्योग समुहाच्या चालविल्या जाणाऱ्या धाराशिव साखर कारखान्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून मागील हंगामात गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन 200 रूपयांप्रमाणे ऊसबिलाचा तिसरा हप्ता व साखर वितरण सुरू केले आहे.
कोरोना महामारी व अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आहे. अशा स्थितीत ही अनेक साखर कारखाने ऊसबिल देण्यास असमर्थ ठरत आहेत. अशावेळी धाराशिव कारखान्याने चांगला दर देण्याची परंपरा कायम ठेवत पोळा, दिवाळीसारख्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या सणांना बिलाची रक्कम बळीराजाच्या खात्यावर जमा केली आहे. काही वर्षांपूर्वी बहुतांश कारखाने हे शेतकऱ्यांचा ऊस गाळप झाल्यावर तसेच पोळा व दिवाळी सणाला बिलाचे पैसे देवू करत. चांगला दर देण्याची स्पर्धा देखील असायची. मागील काही वर्षात चित्र बदलत चालले आहे. काही मोजकेच कारखाने आता वेळेवर ऊसबिल देत आहेत. सध्याची शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेत धाराशिव कारखान्याने जुन्या परंपरेला उजाळा देत शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी मागील वर्षी गाळपाला आलेल्या उसाला प्रतिटन 200 रूपये बिलाा अंतिम हप्ता दिला आहे. याचे नियोजन चेअरमन अभिजित पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. धाराशिव कारखान्याने प्रतिटन उसाला 2500रू. दर जाहीर केला होता. त्याप्रमाणे 2100रू.चा पहिला हप्ता ऊस गाळपानंतर देण्यात आला होता तर पोळ्याला प्रतिटन 200 रू. शेतकऱ्यांना देण्यात आले होते.उर्वरित ऊसबिल प्रतिटन 200 रु. दिवाळीत देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार ही रक्कम व दिवाळीसाठी साखचे वितरण सुरू करण्यात आल्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी एकरी उत्पादन जास्तीत जास्त वाढावे यासाठी डिव्हिपी उद्योग समुहाच्यावतीने शेतकरी मार्गदशन मेळावे, ऊस उत्पादन वाढीसाठी विविध विकास उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही अभिजित पाटील यांनी सांगितले. त्याच बरोबर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रावर ऊस लागवड करावी. या भागातील सर्व ऊस संपेपर्यंत धाराशिव कारखाना गाळप हंगाम सुरू ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली असून सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा ही त्यांनी दिल्या आहेत.