महाद्वार काल्याने पंढपूरमध्ये कार्तिकी यात्रेची सांगता

पंढरपूर,- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा महाव्दार काला मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला असून या काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता झाली आहे.

परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात हांडी फोडण्यात आली. संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजांकडून आषाढी व कार्तिकी वारीमध्ये महाव्दार काल्याचा सोहळा साजरा करण्याची परंपरा आहे. संत पांडुरंग महाराज यांना चारशे वर्षापूर्वी प्रत्यक्ष विठुरायाने आपल्या खडावा अर्थात पादुका दिल्या होत्या अशी अख्यायिका आहे. तेव्हांपासून हा उत्सव साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात मोजक्याच भक्तांना प्रवेश देवून हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाच्या पादुका पागोट्याने बांधण्यात आल्या. यानंतर नामदास महाराज यांनी मदन महाराज यांना खांद्यावर घेवून मंदिरातील सभामंडप येथे पाच प्रदक्षिणा पूर्ण करून दहीहांडी फोडण्यात आली. यानंतर परंपरेप्रमाणे हा काला मार्गक्रमण करीत पुन्हा काल्याच्या वाड्यात दाखल झाला.

या महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता आता झाली आहे. कोरोनामुळे यंदा आषाढीनंतर कार्तिकी यात्रा ही प्रतीकात्मक स्वरूपातच साजरी झाली आहे. दशमी व एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी होवू नये यासाठी संचारबंदी पुकारण्यात आली होती. तर 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. कोरोनामुळे पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर 17 मार्च 2020 पासून आठ महिने बंद होते ते दिवाळी पाडव्यापासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. सध्या भाविकांना कोरोनाविषयक आरोग्याचे सर्व नियम पाळून श्रींचे ऑनलाइन बुकिंगनंतर मुखदर्शन देण्याची व्यवस्था समितीने केली असून याचा लाभ रोज 3 हजार भाविकांना मिळत आहे. दरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद होते तेंव्हा श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे सर्व नित्योपचार व राजोपचार परंपरेप्रमाणे सुरू होते.

.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!