पंढरपूर- विठ्ठल परिवाराने ज्याप्रमाणे कै. औदुंबरआण्णा पाटील, भारतनाना भालके यांना एकत्रित राहून साथ दिली तशीच एकी आताही दाखवून काम करावे. कारखान्यासह या भागाच्या विकासासाठी तुमची एकी महत्वाची आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. दरम्यान त्यांनी वडीलधार्याच्या नात्याने माझे पंढरपूर भागावर पूर्ण लक्ष असल्याचे स्पष्ट केले. ते सरकोली येथे कै. आमदार भारत भालके यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले असता बोलत होते.
शुक्रवारी 18 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता खासदार शरद पवार हे पंढरपूरला आले व तेथून ते सरकोलीत पोहोचले होते. त्यांच्यासमवेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे, सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे व विठ्ठलचे संचालक उपस्थित होते. सरकोली येथे पवार यांनी कै.भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके व कुटुंंबाची भेट घेतली.
कै. भारत भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवाराचा नेता कोण असणार? कारखान्याची सूत्र कोणाकडे जाणार याबाबत उत्सुकता होती. याबाबत पवार काय बोलणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते. पवार यांनी उपस्थित लोकांना संबोधित स्पष्ट केले की, कै. भारतनानांनी पंढरपूर व मंगळवेढ्याचा विकास, मंगळवेढ्याच्या दुष्काळी भागातील पाणी योजना, विठ्ठल कारखाना यासाठी सतत काम केले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने दुःख झाले आहे. मात्र या दुःखातून सावरून विठ्ठल परिवाराने एकत्र राहून त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मध्यंतरीच्या काळात राज्यातील साखर कारखानदारी ही दुष्काळात कमी ऊसपुरवठा तसेच यानंतर साखरेचे दर कोसळल्याने अडचणीत आली आहे. याचा फटका पंढरपूर भागातील साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. कारण येथे उसाचे सर्वाधिक उत्पादन होते.
साखर कारखाने चांगले पाहिजेत व यातून शेतकर्यांचे अर्थकारण सुधारले पाहिजे. निवडणुका येतात जातात मात्र संस्था टिकल्या पाहिजेत. या तालुक्याने कै.औदुंबरआण्णा पाटील यांना साथ दिली व त्यांनी ही येथे संस्था उभारल्या. पुढील काळात त्यांच्याच समवेत काम केलेल्या भारतनानांनी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्षपद स्वीकारले. आता कै. भारत भालके यांचे अचानक निधन झाले आहे. या दुःखातून सावरून तुम्ही सर्वांनी एकत्र येवून काम करा, मी तुमच्या सोबत आहे. असा विश्वास शरद पवार यांनी दिला. यावेळी पवार यांनी आपल्या भाषणात सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांचा सतत उल्लेख केला.
पवार यांनी सरकोलीत आल्यानंतर कारखाना संचालक तसेच विठ्ठल परिवारातील नेते यांची भेट घेतली होती. भाषणात बोलताना ते म्हणाले, येत्या काही दिवसात मी पुन्हा पंढरपूरला येणार आहे. त्यावेळी बसून आपण पुढे काय करायचे ते ठरवू यात मात्र विठ्ठल परिवाराने आता एकत्र राहणे गरजेचे आहे. मी 80 वर्षाचा असून वडीलधारा आहे. या नात्याने माझे लक्ष या भागावर अधिक असणार आहे. कै. भारत भालके यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, भारतनाना ही अनेक पक्षांकडून निवडणुका लढविल्या व ते विजयी ही झाले. मात्र त्यांनी माझ्या प्रती प्रेम कधीच कमी होवू दिले नाही. निवडणुकीत विजय मिळविला की ते बारामतीमध्ये येत. मला हार देऊन म्हणत, मी आहे..
दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौर्यादरम्यान सरकोलीत मोठ्या प्रमाणात भालके समर्थकांनी गर्दी केली होती. कल्याणराव काळे यांच्यासह अनेकजणांनी येथे आपली मनोगत व्यक्त केली.